संगमनेर शहरात भर चौकातील पतसंस्थे समोरून शेतकऱ्याचे १ लाख ३० हजार रुपये चोरले !
प्रतिनिधी —
संगमनेर शहरात चोऱ्या माऱ्या होण्याचे प्रमाण सातत्याने वाढतेच आहे. नुकतेच ग्रामीण रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर सेंटर मधून १२ लाख रुपयांचे साहित्य चोरीस गेले आहे. बस स्थानकावरून सोन्याच्या दागिन्यांची चोरी होत असते, पैशांच्या पाकिटांची, पर्स चोरी होत आहे. घरफोडी होत आहेत. जबरी चोऱ्या होत आहेत. अशातच आता संगमनेर शहरात भर चौकातील एका पतसंस्थेसमोरून शेतकऱ्याचे एक लाख तीस हजार रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.

संगमनेर शहरातील सर्वोदय नागरी सहकारी पतसंस्थेच्या परिसरात शेतकऱ्याने त्याची मोटार सायकल एम एच १७ सी ८७२२ हिच्या डिक्कीत प्लास्टिकच्या पिशवी ठेवलेले एक १ लाख ३० हजार रुपये कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत. त्यामध्ये ५००, २०० आणि १०० रुपयांच्या ३०० नोटा होत्या. भर चौकात ही घटना घडल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.

मारुती चांगदेव वर्पे (रा. चिकणी, तालुका संगमनेर) असे पैसे चोरी गेलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. वर्पे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. शहर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक गवळी हे करत आहेत.

