घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात घरफोडी १२ लाखाच्या मालमत्तेची चोरी !

ग्रामीण रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड

प्रतिनिधी —

कोरोना काळात ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर गरज भासत होती. तत्कालीन महाराष्ट्र सरकारने विशेष प्रयत्न करून शासनाच्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी ऑक्सिजन साठी मोठी मदत केली होती. संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयात देखील ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभा करण्यात आला होता. या प्लांट मधून ही चोरी झाली असून १२ लाख ६१ हजार २९ रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे.

ग्रामीण रुग्णालयाकडून या प्लांट च्या बाबतीत कुठलीही सुरक्षा केली जात नसल्याचे उघड झाले आहे. रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा त्यामुळे चव्हाट्यावर आला आहे.

सोमवारी ही चोरी झाली असून अज्ञात चोरट्यांनी घुलेवाडी ऑक्सीजन प्लांट मधून तांब्याचे पाईप आणि ऑक्सिजनचे आउटलेट टर्मिनल चोरून नेले आहेत. त्याची किंमत १२ लाख ६१ हजार २९ रुपये असल्याचे फिर्यादीत नोंदविण्यात आलेले आहे.

शकुंतला आसाराम पालवे, परिसेविका ग्रामीण रुग्णालय, ट्रॉमा सेंटर, घुलेवाडी, संगमनेर यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

अज्ञात चोरट्यांनी ट्रॉमा केअर सेंटर घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीवरून आत मध्ये प्रवेश करून सेंट्रलाइज ऑक्सिजन पाईप लाईन व टर्मिनल तोडून त्यातील तांब्याचे पाईप चोरी करून घेऊन गेले आहेत. संगमनेर शहर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!