दूधगंगा पतसंस्था घोटाळा प्रकरणाचा तपास संगमनेर शहर पोलिसांकडून काढला…

आता कोण करणार आहे तपास ? वाचा मोठी बातमी….

प्रतिनिधी —

संगमनेरातील बहुचर्चित ठरलेल्या आणि सहकारी चळवळीवर आधारित असलेल्या पतसंस्था विश्वातील सर्वात मोठ्या ८१ कोटीच्या अपहार प्रकरणाचा तपास आता नगर आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे. दरम्यान अटकेत असलेल्या पाचही आरोपींना न्यायालयाने आज न्यायालयीन कोठडी दिली आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा प्राथमिक तपास संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केला होता. मात्र गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेता अपहाराची रक्कम मोठी असल्याने, गुन्हा गुंतागुंतीचा क्लिष्ट व किचकट स्वरूपाचा असल्याने तसेच आरोपींची संख्या देखील मोठी असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हा गुन्हा शहर पोलिसांकडून काढून अहमदनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोमवारी वर्ग केला आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा पुढील तपास आता आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे.

लहानु गणपत कुटे, उल्हास रावसाहेब थोरात, सोमनाथ कारभारी सातपुते या तीन रोखपालांसह अमोल प्रकाश क्षीरसागर या वैधानिक लेखापरीक्षक आणि व्यवस्थापक भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ या पाच आरोपींची पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपल्याने व सदरचा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्याने आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक कमलाकर जाधव यांनी आरोपींना वाढीव पोलीस कोठडी मिळण्यासाठी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले होते. मात्र न्यायालयाने पोलिसांची मागणी फेटाळत आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

संगमनेर शहरातील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचा तब्बल ८१ कोटीचा अपहार समोर आला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात २१ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेरकरांचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागलेल्या या घोटाळ्यात पोलिसांनी आतापर्यंत केवळ पाच आरोपींना अटक केली. यात गुन्ह्यातील प्रत्यक्ष सहभाग असलेल्या संस्थेच्या मॅनेजरचा तर अपहार करणाऱ्या १५ जणांना सहकार्य करणाऱ्या चार जणांचा अटकेतील आरोपीत समावेश आहे.

आर्थिक घोटाळ्याच्या या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मास्टर माईंड असलेला बँकेचा अध्यक्ष, राजकीय नेता भाऊसाहेब कुटे आपल्या कुटुंबीयातील आरोपींसह अद्यापही पसार आहे. तब्बल डझनभर आरोपींच्या पोलीस शोधात असे असले तरी यातील काही आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला असल्याची माहिती समोर येत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!