अमृतवाहिनी बँकेला राष्ट्रीय स्तरावरील बँकोचा ‘ब्ल्यू रिबन’ पुरस्कार !
प्रतिनिधी —
शेतकऱ्यांची आर्थिक कामधेनु असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेस राष्ट्रीय स्तरावरील बँको या संस्थेचा ‘ब्ल्यू रिबन’ पुरस्कार – २०२३ जाहीर झाला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सुधाकर जोशी व उपाध्यक्ष ॲड. नानासाहेब शिंदे यांनी दिली आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्त व विचारांवर बँकेची वाटचाल सुरू असून आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली बँकेने सातत्याने ऑडिटचा अ दर्जा मिळून शेतकरी व सर्वसामान्य मदत केली आहे. अमृतवाहिनी बँकेने नुकताच दुग्धविकास कर्ज योजनेअंतर्गत सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आनंद पुरवण्याचे काम सुरू केले. छोटे शेतकरी व व्यावसायिक यांच्यासाठी ही विविध योजना लागू केल्या आहेत. ५०० दूध उत्पादकांना बिगर तारण दीड लाखापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. तसेच कारखान्याच्या ऊस तोडणी कामगार व ऊस वाहतुकीसाठी ३० कोटी रुपयांचे कर्ज बँकेने प्रथमच उपलब्ध करून दिले आहे.

याचबरोबर नव्याने आश्वी बु. व संगमनेर खुर्द येथील शेतकी संघ पेट्रोल पंपाजवळ बँकेची शाखा सुरू केली जाणार आहे. काळानुरूप केलेले बदल बँकेला लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न यासह या बँकेचे संगणकीय कामकाज, एटीएम, नवीन अद्यावत सुविधांसह असलेली अमृतनगर येथील मुख्य शाखा व संगमनेर मार्केट यार्ड, नेहरू चौक, तळेगाव, घारगाव, साकुर या ठिकाणीही विविध शाखा कार्यरत आहेत. या सर्व शाखांचे नूतनीकरण व आधुनिकीकरणाचे काम करण्यात आले असून नव्याने डॉ. जयश्री थोरात यांच्या हस्ते मुख्य शाखेत अत्याधुनिक लॉकर ची सुविधा व्यवस्था कार्यान्वित झाली आहे. तसेच संगमनेर शहरातील पेटीत विद्यालया जवळ असलेली शाखा मेन रोड येथे हलवण्यात येणार आहे.

सभासद, शेतकरी व नागरिकांचा मोठा विश्वास या बँकेने संपादन केला आहे. ग्रामीण भागात असूनही पाचशे कोटींची ठेव असलेल्या या बँकेने केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल बँको या राष्ट्रीय स्तरीय संस्थेने सन २०२२-२३ चा ब्ल्यू रिबन पुरस्काराने सन्मानित केले आहे. यापूर्वीही अमृतवाणी बँकेला हा पुरस्कार मिळाला होता. ४ ते ६ ऑक्टोबर २०२३ दरम्यान दमन येथील कार्यक्रमात या पुरस्काराने बँकेला सन्मानित करण्यात येणार आहे.

बँकेला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास वाणी, अधिकारी, कर्मचारी यांचे आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, सोमेश्वर दिवटे आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

