डॉ.जयश्री थोरात यांना सत्कारातून मिळालेल्या अडीच हजार वह्यांचे विद्यार्थ्यांना वाटप !
प्रतिनिधी —
सामाजिक कार्यकर्त्या डॉ.जयश्री बाळासाहेब थोरात यांनी विविध कार्यक्रमातून होणाऱ्या आपल्या सत्कारात हार व बुके ऐवजी वह्या देण्याच्या केलेल्या अहवानानंतर सत्कारातून मिळालेल्या सुमारे २ हजार ५०० वह्यांचे गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले असून यामुळे या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे.

आमदार बाळासाहेब थोरात यांच्या समृद्ध सामाजिक कार्याचा वारसा घेऊन एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून समाजकार्यात व महिला आरोग्याच्या प्रश्नासाठी काम करणाऱ्या युवा नेत्या डॉ.जयश्री थोरात यांनी विविध कार्यक्रम प्रसंगी आपल्याला हार व बुके न देता आयोजकांनी त्या ऐवजी ५ वह्या द्याव्यात असे आवाहन केले होते.

या आवाहना नुसार विविध कार्यक्रमांमधून तालुक्यातील व जिल्ह्यातील कार्यकर्ते नागरिक यांनी डॉ. थोरात यांचा सन्मान सत्कार करताना हार व बुके न देता पाच वह्या दिल्या होत्या. यामधून साधारण जमा झालेल्या या वह्यांचे वितरण संगमनेर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा मधील गरजू विद्यार्थ्यांना करण्यात आले.

शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये नवे शैक्षणिक वर्ष, नवीन वर्ग, नवे कपडे, नवी पुस्तके व वह्या याबद्दल मोठे कुतूहल असते. शाळेच्या पहिल्या, दुसऱ्या दिवशीच एकविरा फाउंडेशनच्या वतीने या वह्या विद्यार्थ्यांना दिल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे.

यावेळी बोलताना एकविरा फाउंडेशनच्या सचिव ज्योती थोरात म्हणाल्या की, डॉ. थोरात यांच्या माध्यमातून महिला युवती व मुलींसाठी मोठे काम होत असून सत्कारात मिळालेल्या या वह्या या चिमुकल्यांना मिळाल्यानंतर या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरील समाधान हे आनंद देणारे आहे.

