सहकारमहर्षी थोरात सह.साखर कारखान्याच्या वतीने नव्या हंगामासाठी ऊस विकास योजना !
प्रतिनिधी —
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याने कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी लागवड हंगाम सन २०२४ – २५ चे गळीत हंगामा करिता को.८६०३२, को.एम.०२६५,कोसी.६७१,कोव्हीएसआय ०८००५, को. ९०५७, एम.एस.१०००१ या व इतर नवीन जादा साखर उतारा देणाऱ्या मान्यताप्राप्त जातींच्या ऊसाची लागवड करतील व खोडवा राखतील त्या शेतकऱ्यांकरिता कारखान्यामार्फत दिनांक १/६/२०२३ पासून ऊस विकास योजना राबविण्याचे धोरण संचालक मंडळाने घेतले आहे.

कारखाना कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त ऊस लागवड होवून गाळप क्षमतेइतका ऊस निर्माण होण्यासाठी कारखान्याचे संचालक मंडळ व आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनानुसार सतत ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध ऊस विकासाच्या योजना राबविण्याचे धोरण घेत असतो.

यानुसार गळीत हंगाम सन २०२४ -२०२५ करीता लागवड होणारे आडसाळी, पूर्वहंगामी सुरु व खोडवा ऊसासाठी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रासायनिक खते, जिवाणू खते, बेणे पुरवठा, सेंद्रीय खत, हिरळीचे खत,.गांडुळ खत, माती परिक्षण, ठिबक वरील ऊसासाठी अनुदान,ऊस रोपे पुरवठा इतर विविध ऊस विकास योजना जाहिर केलेल्या आहेत.

कारखाना बेणे वाटप, ऊस रोपांद्वारे ऊस लागवड कार्यक्रम, संशोधन संस्थेकडील बेणे पोहच व्यवस्था करण्यात येणार आहे. वसूल पात्र बिनव्याजी योजनेअंतर्गत द्रवरुप जिवाणू खते, हिरवळी खते, किड व रोग नियंत्रण औषधे पुरविण्यात येतील. शेतकऱ्यांसाठी जैविक रोग नियंत्रक व माती, पाणी नमुना तपासणी माफक दरात उपलब्ध असून ठिबक सिंचन योजनेसाठी प्रति एकरी चार हजार रुपयांचे मीटर पेप्सी लॅटरल वसुलीच्या अटीवर दिले जाईल. ऊस लागवड केल्यानंतर वसुलीच्या अटीवर अमृतशक्ती दाणेदार सेंद्रीय खत देण्यात येईल. तसेच उच्चांकी ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ऊस उत्पादकता पुरस्कार ही देण्यात येणार आहे.

कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी वरील ऊस विकास योजनांचे अधिक माहितीसाठी शेतकी विभागाशी संपर्क साधून योजनांचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त ऊस लागवड करावी असे आवाहन संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.

