संगमनेर : काकडवाडीत घरफोडी !
सोन्याचांदीच्या दागिन्यांसह संसार उपयोगी साहित्य चोरून नेले…
प्रतिनिधी —
संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागात काकडवाडी या ठिकाणी घरफोडी झाली असून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह संसार उपयोगी वस्तू चोरून नेल्या असल्याची घटना घडली आहे.

संगमनेर तालुक्यातील काकडवाडी या ठिकाणी राहणाऱ्या बिजलाबाई साहेबराव जगताप यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह टीव्ही, इलेक्ट्रॉनिक शेगडी, गॅस सिलेंडर, गॅस शेगडी गव्हाच्या गोण्या, भुईमुगाच्या गोण्या तसेच स्टील व ॲल्युमिनियमचे डबे, नऊवारी साड्या असे संसार उपयोगी सामान सुद्धा चोरून नेले आहे.

३२ हजार रुपये किमतीच्या संसार उपयोगी साहित्यासह १५ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. बिजलाबाई जगताप यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून संगमनेर तालुका पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सानप हे करत आहेत.

