कॉम्रेड दत्ता देशमुख, बी.जे.खताळ पाटील यांच्या आठवणींना उजाळा देत निळवंडे कालव्याचे जलपूजन !

प्रतिनिधी —

उत्तरनगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या निळवंडे धरणाचे पाणी डाव्या कालव्यातून ३६ कि.मी.चा प्रवास करीत संगमनेर तालुक्यात पोहोचले. जवळेकडलग येथे आढळा नदीच्या पुलावर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी जलपुजन केले. यावेळी कॉम्रेड दत्ता देशमुख, बी.जे.खताळ पाटील यांच्या आठवणींना उजाळा देत शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी या पाण्याचा आनंदोत्सव साजरा केला.

निळवंडे धरणातून ३१ मे २०२२ रोजी १०० क्युसेकने डाव्या कालव्यामध्ये चाचणी घेण्यासाठी पाणी सोडण्यात आले. या पाण्याचा प्रवास संगमनेर तालुक्यात पिंपळगाव कोंझिरेपासून सुरु झाला. आज पाचव्या दिवशी जवळेकडलग येथे पाण्याचे आगमन झाले. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील शेतकऱ्यांनी पाण्याची मंत्रोच्चारात शास्त्रोक्त पद्धतीने खणानारळाने ओटी भरुन  पाण्याचे पुजन केले. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष सतिष कानवडे, अमोल खताळ, वैभव लांडगे, गोकुळ लांडगे, डॉ. सोमनाथ कानवडे, बापू देशमुख, अशोक नन्नवरे, डॉ. वाघमारे, संतोष लांडगे, संदेश देशमुख, लहानू नवले, विकास गुळवे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेली अनेक वर्षे निळवंडे धरणाच्या पाण्याची प्रतिक्षा लाभक्षेत्राला होती. यापूर्वी राज्यात युती सरकार असताना, धरणाच्या मुखापाशी प्रत्यक्ष कालव्याच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर कालव्याच्या कामांतील सर्व अडथळे दूर झाले. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जेष्ठनेते मधुकरराव पिचड, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, यांच्या पुढाकाराने कालव्यांची कामं वेगाने सुरु झाली. राज्यात आता भाजपा सेना युतीचे सरकार पुन्हा स्थापन झाल्यानंतर या सरकारने कालव्याच्या कामांसाठी सुमारे ५१७७ कोटी रुपयांच्या खर्चास सुधारीत प्रशासकीय मान्यता दिल्याने कालव्यांच्या कामांची गती चांगल्या पद्धतीने वाढली. धरणातील पाणी डाव्या कालव्यात सोडण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रथम चाचणी यशस्वी झाल्याने धरणातील पाणी डाव्या कालव्याने मार्गस्थ होत असल्याचा आनंद शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे.

या धरणाच्या निर्मितीत सुरुवातीपासून कॉम्रेड दत्ता देशमुख, बी.जे.खताळ पाटील यांचेही मोलाचे योगदान राहिले. जवळेकडलग येथील शेतकऱ्यांनी आजच्या पाणीपुजनाच्या निमित्ताने या दोन्ही नेत्यांच्या आठवणींना उजाळा देवून पाणी आल्याचे समाधान व्यक्त केले. राज्यसरकारने या धरणाच्या संदभात सकारात्मक भूमिका घेवून शेतकऱ्यांना दिलासा दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!