संगमनेर : घुलेवाडीत भर दिवसा घरफोडी !
प्रतिनिधी —
संगमनेर शहरा नजीक असणाऱ्या घुलेवाडी मध्ये अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा घरफोडी केली असून घरातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही चोरी रविवारी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत भर दिवसा झाली असल्याचे नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे.

घुलेवाडी परिसरातील वेल्हाळे रोडवर राहणाऱ्या भागवत पुंजा राऊत यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप कोणीतरी अज्ञात चोरट्याने तोडून घरात प्रवेश केला. आणि बेडरूम मध्ये असणाऱ्या कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेले. यामध्ये सोन्याचे कानातील झुबे व सोन्याचे मनी मंगळसूत्र असा एकूण ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.

भागवत पुंजा राऊत (राहणार वेल्हाळे रोड, घुलेवाडी, तालुका संगमनेर) यांनी दोन अज्ञात चोरट्या विरुद्ध फिर्याद दिली आहे. संगमनेर शहर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक फौजदार लोखंडे हे पुढील तपास करीत आहेत.

