संगमनेरच्या सकल हिंदू मोर्चा नंतर समनापुर मध्ये दगडफेक !
परिस्थिती नियंत्रणात ; संगमनेर आणि समनापुर मध्ये शांतता…
प्रतिनिधी —
सकल हिंदू समाज मोर्चा संपल्यानंतर संगमनेर येथून परतीच्या मार्गावर असलेल्या मोटार सायकल वरून जाणाऱ्या युवकांनी शहराजवळील समनापुर गावात घोषणा बाजी केल्यावर त्या ठिकाणी एका दुकानातून सुद्धा घोषणा देण्यात आल्या त्यामुळे मोटरसायकल वरून पुढे गेलेले हे युवक पुन्हा मागे वळून आले आणि दोन्ही गट समोरासमोर आल्याने तुफान दगडफेक झाली. या दगडफेकीत काही वाहनांचे नुकसान झाले असून दोघेजण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे.

संगमनेर शहरात उपस्थित असलेले पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी फौजफाट्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या समवेत अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे देखील समनापुर येथे दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे.

शांतता आणि कायद्याची परिस्थिती बिघडवण्याला जबाबदार असणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही. संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील. कोणीही अफवा पसरवू नका असे आवाहन पोलीस अधीक्षक ओला यांनी केले. दरम्यान समनापुर मध्ये शांतता आहे.

