संगमनेरात जोर्वे नाक्यावर धारदार शस्त्रांसह गुंडगिरी !
ग्रामीण भागातील युवकांनी गाडीचा हॉर्न वाजवला म्हणून बेदम मारहाण…
पोलिसात तक्रार केली म्हणून पुन्हा धारदार शस्त्रांसह मारहाण !

संगमनेर शहराची शांतता व सुव्यवस्था बिघडविण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल आणि तो कितीही मोठा असेल तरी अशा कोणत्याही गुन्हेगाराला पाठीशी घातले जाणार नाही. आरोपींवर कडक कारवाई केली जाईल. शहराची शांतता बिघडवणाऱ्यांची गय केली जाणार नाही.
भगवान मथुरे, पोलीस निरीक्षक

प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथील काही युवक एका पिकअप वाहनातून गावाकडे जात असताना शहरात जोर्वे नाका परिसरात गाडीचा हॉर्न वाजवला म्हणून एका टोळक्याने वाहनातील युवकांना बेदम मारहाण केली. या युवकांना रुग्णालयात दाखल करावे लागले. जखमींना रुग्णालयात दाखल करून आणि पोलीस ठाण्यात तक्रार करून फिर्याद दिल्यानंतर पुन्हा जोर्वे गावाकडे जात असताना जोर्वे नाक्यावर त्याच गुंडांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तलवारी, चॉपर, लोखंडी रॉड, काठ्या, फायटर या शस्त्रांनी पुन्हा त्या तरुणांना व त्यांच्या काही मित्रांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी करण्याची घटना काल सायंकाळी संगमनेर तालुक्यातील जुन्या पुणे – नाशिक महामार्गावरील जोर्वे नाक्यावर घडला आहे. या जबर मारहाणीत ८ जण जखमी झाले आहेत. शहर पोलिसांनी १७ जणांसह इतर अज्ञात शंभर ते दीडशे जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

सुमित पोपट थोरात, तन्मय राजेश दिघे, पुंडलिक पोपट दिघे, विजय मंजाबापू थोरात, अजय भिमाजी थोरात, जितेंद्र कैलास दिघे, रवींद्र नामदेव गाडेकर, बाबासाहेब शिवाजी थोरात अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

बाबू टपरीवाला (पूर्ण नाव पत्ता माहित नाही.), इमरान वडेवाला (पूर्ण नाव पत्ता माहित नाही.), नदीम हुसेन शेख, इमरान (युसुफ पेंटरचा मुलगा, पूर्ण पत्ता माहित नाही.), रियाज जहीर शेख रिक्षावाला (पूर्ण पत्ता माहीत नाही.), साफिक चहावाला (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही.), साफिक (पूर्ण नाव माहित नाही.), इरफान (पूर्ण नाव माहित नाही.), अकील टपरीवाला (पूर्ण नाव माहित नाही.), ताहीर नजीर पठाण (पूर्ण पत्ता माहित नाही.), शाहिद वाळू वाला (पूर्ण नाव माहित नाही.), मुसेफ शेख (पूर्ण नाव माहित नाही.), इफु वडेवाला (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही.) अराफत रफिक शेख (पूर्ण नाव पत्ता माहित नाही.), इरफान वडेवाला याच्याकडे काम करणारे तीन जण (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही.) आणि इतर १०० ते १५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील जखमी नंबर एक ते चार हे सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पिकप गाडी मधून जात असताना जोर्वे नाक्यावर गाडीचा हॉर्न वाजविल्याच्या कारणातून यातील काही आरोपींनी या चौघांना मारहाण केली. त्यामुळे सदर सगळेजण व इतर साथीदार हे ग्रामीण रुग्णालयात उपचार करून, संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन जोर्वे या गावी परत जात असताना “ये वही लोग है, जो अपने खिलाफ पोलीस स्टेशन मे तक्रार करणे गये थे. आज इनको जिंदा घर नही जाने देंगे” असे म्हणत वरील आरोपीं सह त्यांच्यासोबत असलेल्या शंभर ते १५० जणांनी या सर्वांवर शस्त्रांसह हल्ला करीत फिर्यादी आणि साक्षीदार यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला करून फिर्यादीच्या डोक्यात, पाठीवर लोखंडी रॉड मारून तसेच धारदार शस्त्राने फिर्यादीच्या पाठीवर जखमा करून त्याच्या इतर साथीदारांनाही लाकडी दांडे, रॉड, फायटर, चॉपर आणि तलवारीने जखमी करून ठार मारण्याचा प्रयत्न केला.

रवींद्र नामदेव गाडेकर (राहणार विठ्ठल मंदिर, जोर्वे, तालुका संगमनेर) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 418/2023 भारतीय दंड विधान कलम 307, 324, 143, 147, 148, 149, आर्म 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव हे करीत आहेत.

या मारहाणी नंतर पोलीस ठाण्यामध्ये जोर्वे ग्रामस्थ जमा झाल्याने प्रचंड तणावाचे वातावरण बनले होते. शहरात आज सकाळपासून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू केल्या आहेत. तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला असून. आज सकाळपासूनच संगमनेर शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा बोलवण्यात आला आहे.

