घारगावात दिवसाढवळ्या घरफोडी, सोन्याचे दागिने लंपास !
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील पठार भागात असणाऱ्या घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसा घरफोडी झाली असून या घरफोडीत सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. विशेष म्हणजे दिवसाढवळ्या घरफोडी झाल्याने घारगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेवर टीका होऊ लागली आहे.

संगमनेर तालुक्यातील चोऱ्या आणि घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. संगमनेर शहरापासून तालुक्यात दररोज मोटरसायकल चोरी अगदी रतीब घातल्यासारखी सुरू आहे. लहान मोठ्या चोऱ्यांबरोबरच घरफोड्यांचे देखील प्रमाण सातत्याने वाढते आहे. ग्रामीण भागात सुद्धा याचे लोन पसरलेले आहे. तालुक्यातील पठार भागात सातत्याने चोऱ्या होत आहेत.

शुक्रवारी दुपारी दीड ते साडेतीन वाजण्याच्या दरम्यान घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांडवे बुद्रुक येथील हवालदार वस्तीवरील सय्यद यांच्या राहत्या घराचे प्रवेशद्वार उघडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व काही रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे.

मन्सूर इमान सय्यद (रा. मांडवे बुद्रुक, हवालदार वस्ती) यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. घारगाव पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक यु.व्ही. पतंगे हे पुढील तपास करीत आहेत.

संगमनेर तालुक्यातील पठार भागात असणाऱ्या घारगाव पोलीस ठाण्यातील हद्दीत सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. यामध्ये मोटार सायकल चोरी, शेतकऱ्यांच्या विद्युत मोटार चोरी, विजेच्या तारा व इतर चोऱ्यांचे सत्र सुरू आहे. घारगाव पोलिसांना या गुन्ह्यांना आळा घालता आलेला नाही. तसेच यापूर्वी घडलेल्या गुन्ह्यांचा तपास लावण्यात देखील घारगाव पोलीस अपयशी ठरले आहेत.

