नव्या धोरणामुळे वाळू तस्करी हद्दपार होईल !

महसूल मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांचा विश्‍वास

 प्रतिनिधी –

राज्याचे वाळू आणि गौण खनिज बाबतचे धोरण नुकतेच जाहीर करण्यात आल्याने नागरिकांना एक हजार रुपयात एक ब्रास वाळू मिळणार आहे. या व्यवसायातील एजंटगिरी थांबवून सरकारच आता लोकांना वाळू पुरवठा करणार असल्याने लोकांचा मोठ्या प्रमाणात पैसा वाचेल. नव्या धोरणातून वाळू तस्करी पूर्णपणे हद्दपार होईल असा विश्वास व्यक्त करतानाच, खडीसाठी नवीन धोरण ठरवण्यात आले असल्याची माहीती महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणी बुद्रूक येथील ग्रामसभेत दिली. शिवरस्ते, पानंद रस्ते नियमानुसार काढण्याचे काम महसूल विभागाने हाती घेतले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोणी बुद्रुक येथे परंपरेनूसार गुढी पाडव्यानिमित्त ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, खा.डॉ.सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, ट्रक्स वाहतूक संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर राठी, तंटा मुक्तीचे अध्यक्ष संपतराव विखे, प्रवरा बँकेचे माजी संचालक किसनराव विखे, सरपंच कल्पना मैड, उपसरपंच गणेश विखे, माजी सरपंच लक्ष्‍मण बनसोडे, उपसरपंच अनिल विखे, विकास संस्थेचे अध्यक्ष अशोकराव धावणे, उपाध्यक्ष नाना म्हस्के, मुरलीधर विखे, चांगदेव विखे, लक्ष्मण बनसोडे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, विभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, सपोनि युवराज आठरे, भूमापनचे पाटील आदी उपस्थित होते.

प्रारंभी ग्रामपुरोहित धर्माधिकारी यांनी दाते पंचांगानुसार यावर्षीच्या पाऊस पाण्याचे भाकीत केले. ते म्हणाले की, मृग नक्षत्राच्या उत्तरार्धात २० जूनला पावसाला सुरुवात होईल. ५ जुलै पर्यंत समाधानकारक पाऊस होऊन खरीप पेरण्या होतील. १५ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत भरपूर पाऊस पडेल, बाजरी, सोयाबीनसह खरीप पिके उत्तम येतील, रोगराई कमी राहील, माणसांचे आरोग्यही चांगले राहील, नकारात्मकता कुठेही नसेल, मृग,आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य,पूर्वा, उत्तरा या नक्षत्रांचा खूप पाऊस पडेल,सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडेल असे भाकीत त्यांनी वर्तविले.

ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना विखे म्हणाले की, आपल्या पुढाकाराने राज्याचे वाळू आणि गौण खनिज बाबतचे धोरण नुकतेच जाहीर करण्यात आले. नागरिकांना एक हजार रुपयात एक ब्रास वाळू मिळणार आहे. लोकांचा मोठ्या प्रमाणात पैसा वाचणार आहे. वाळू तस्करी पूर्णपणे हद्दपार करण्यात आली आहे. खडीसाठी नवीन धोरण ठरवण्यात आले आहे. सर्व शिवरस्ते, पानंद रस्ते नियमानुसार काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

लोणी बुद्रुक गावच्या नकाशात अनेक वर्षांपासून झालेल्या चुका दुरुस्त केल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या हद्दीत शेतीचे प्लॉट पाडून ते विकण्यात आले. रस्ते, गटार यासाठी जागा सोडण्यात आली नाही.बेकायदा बांधकामे करण्यात आली. त्यांची माहिती संकलित करून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. बांधकामे करताना ग्रामपंचायतीची पूर्व परवानगी न घेतलेल्याना सुविधा देण्याची ग्रामपंचायतीची जबाबदारी नाही. जर कुणाला पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन दिले असेल तर तातडीने बंद करावे, नियमबाह्य कामांवर कारवाई होईल विखे पाटील यांच्या सूचनेनुसार ग्रामसभेत तसा ठराव मंजूर करण्यात आला.

यावेळी अण्णासाहेब म्हस्के पाटील, खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी मार्गदर्शन करून पाडव्याच्या ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या. ग्राविकास अधिकारी संतोष थिगळे यांनी विकास कामांची माहिती दिली. माजी सिनेट सदस्य अनिल एकनाथ विखे यांनी प्रास्ताविक तर माजी उपसरपंच अनिल नानासाहेब विखे यांनी आभार मानले. सभेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!