नासिक – पुणे हायस्पीड रेल्वे भूसंपादन पुन्हा थांबणार ?

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

नासिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. खरं पाहता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या रेल्वे मार्गाला हिरवा कंदील दाखवला होता. यामुळे हा रेल्वे मार्ग लवकरच पूर्ण होईल अशी आशा होती. दरम्यान या रेल्वे मार्गासाठी आवश्यक भूसंपादन देखील सुरू करण्यात आले होते. या मध्यम द्रुतगती ब्रॉडगेज लाइनच्या विद्युतीकरणासह बांधकामासाठी भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येत होती.

अशातच मात्र या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाबाबत महारेलच्या माध्यमातून मोठी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार महारेलने या रेल्वे मार्गासाठी सुरू असलेले भूसंपादन थांबवण्यासाठी नासिक जिल्हाधिकारी कार्यालयास पत्र पाठवले आहे. यामुळे आता या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाबाबत पुन्हा एकदा संभ्रमअवस्था तयार झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रेल्वे मार्गसाठी आतुरतेने वाट पाहिली जात आहे.

यामुळे या रेल्वे मार्गासाठी भूसंपादन प्रक्रियेने वेग पकडल्याने नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र आता महारेल कडून पत्र पाठवून या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाला ब्रेक लावण्याची विनंती करण्यात आली असल्याने आता नवीन वाद पेटण्याची शक्यता आहे. खरं पाहता हा रेल्वे मार्ग नाशिक पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची पर्वणी सिद्ध होणार आहे. यामुळे, पश्चिम महाराष्ट्रातील या दोन्ही शहरांदरम्यान रेल्वे मार्गाने थेट कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होणार आहे. मात्र आता हा रेल्वे मार्ग पुन्हा एकदा बारगळला असल्याचे चित्र तयार होत आहे.

खरं पाहता या रेल्वे मार्गासोबत गेल्या वर्षी औद्योगिक कॉरिडॉर विकसित केला जाईल अशी घोषणा फडणवीस यांनी केली. यामुळे हा रेल्वे मार्ग प्रकल्प दुसऱ्याच दिशेला घेऊन जाण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांनी केला. तसेच गेल्या वर्षी या रेल्वे मार्ग प्रकल्पावर काही आक्षेप देखील केंद्रीय समितीकडून उपस्थित करण्यात आले. यामुळे दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत या रेल्वे मार्गावरील आक्षेप दूर करण्याचा प्रयत्न केला.

यानंतर फडणवीस यांनी या रेल्वेमार्गासंदर्भात असलेले आक्षेप दूर झाले असल्याचे सांगितले. तसेच या रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचे व महारेल चे अधिकारी एक संयुक्त पाहणी करतील आणि सविस्तर नवीन अहवाल सादर करतील असं ठरवून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या रेल्वेमार्ग प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला. नवीन अहवाल सादर केल्यानंतर हा अहवाल मंत्रिमंडळाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

यामुळे, मध्यंतरी रखडलेला हा रेल्वे मार्ग आता लवकरच पूर्ण होईल अशी आशा व्यक्त केली जाऊ लागली. शिवाय या रेल्वे मार्गासाठी भूसंपादन प्रक्रियेने देखील वेग पकलला होता. अशातच मात्र गेल्या आठवड्यात महारेल कडून नासिक जिल्हाधिकारी कार्यालयाला एक पत्र पाठवत या रेल्वे मार्गाचे भूसंपादन थांबवण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. निधी उपलब्ध नसल्याने भूसंपादनाचे काम थांबवावे असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.आम्ही आपणास सांगू इच्छितो की, हा रेल्वे मार्ग नासिक मधील सिन्नर आणि नासिक या दोन तालुक्यातून प्रस्तावित करण्यात आला आहे.

या दोन तालुक्यातील एकूण 22 गावात हा रेल्वे मार्ग जाणार असून यासाठी भूसंपादन सुरू झाले होते. आतापर्यंत सिन्नर तालुक्यात या रेल्वे मार्गासाठी 45 हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे.अशातच मात्र महारेलकडून भूसंपादन थांबवण्यासाठी पत्र जारी झालं असल्याने आता पुन्हा एकदा हा रेल्वे मार्ग बारगळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे नासिक पुणे रेल्वे मार्गाचीं आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रवाशांच्या आनंदावर विरजण पडले असल्याची भावना व्यक्त होत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!