महसूल मंत्री विखे पाटील यांच्या प्रयत्नातून संगमनेर तालुक्यासाठी १ कोटी ५३ लाख २४ हजार रुपये अनुदान मंजूर !
प्रतिनिधी —
राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध व्यक्तिगत लाभाच्या योजनांपोटी तालुक्यातील १९ हजार १२३ लाभार्थ्यांना मार्च २०२३ अखेर १ कोटी ५३ लाख २४ हजार रुपयांचे अनुदान मंजुर झाले आहे. महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग झाले असल्याची माहिती विखे पाटील यांच्या प्रसिद्धी विभागाकडून देण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या माध्यमातून विविध सामाजिक योजनांची अंमलबजावणी केली जाते. यामध्ये प्रामुख्याने सर्वसाधारण तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती वर्गासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटूंबलाभ योजना अशा योजनांचा यामध्ये समावेश आहे.

तालुक्यातील सुमारे १९ हजार १२३ लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ मिळावा म्हणून प्रस्ताव दाखल केले होते. या प्रस्तावांना नुकतीच मंजुरी मिळाली असून, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्याच्या सुचना प्रशासनास दिल्या होत्या. त्याप्रमाणे १९ हजार १२३ लाभार्थ्यांच्या खात्यात सुमारे १ कोटी ५३ लाख ५४ हजार ६०० रुपयांचे अनुदान वर्ग झाले आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजनेत सर्व साधारण ४५७३ लाभार्थ्यांना ४६ लाख ३२ हजार २०० रुपये, संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जातीसाठी ५०० लाभार्थ्यांना ५ लाख ६ हजार २०० रुपये , संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जमातीसाठी १६८ लाभार्थ्यांना १ लाख ७३ हजार ३०० रुपये, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना गट ब सर्वसाधारण व गट अ योजनेतील ८९०९ लाभार्थ्यांना ८१ लाख २८ हजार ९०० रुपये, श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्ती वेतन योजना अनु.जाती योजनेतील ६९३ लाभार्थ्यांना ६ लाख ९३ हजार रुपये, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन अनु जमाती योजनेतील ३२१ लाभार्थ्यांना ३ लाख २१ हजार रुपये, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनेतील ३८२२ लाभार्थ्यांना ७ लाख ७९ हजार २०० रुपये, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेतील २०१ लाभार्थ्यांना ६० हजार ३००,इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृती वेतन योजनेतील ३५ लाभार्थ्यांना १० हजार ५०० रुपये, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील १ लाभार्थ्याला २० हजार रुपये प्राप्त झाले आहे.

सदर योजनांचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या सहकार्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यख सतिष कानवडे, शहर अध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले, अमोल खताळ, भाजयुमोचे शैलेश फटांगरे, सरपंच संदिप देशमुख, कोल्हेवाडीच्या सरपंच सुवर्णा दिघे, जोर्वेच्या सरपंच प्रिती दिघे यांनी आभार मानले आहेत.

