गावठी कट्टा आणि काडतुसांसह दोघेजण पकडले !

वेशांतर करून पोलिसांची कारवाई…

प्रतिनिधी —

जामखेड तालुक्यातील नान्नज येथे गावठी कट्टा आणि चार जिवंत काडतुसांसह दोन सराईत आरोपींना नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.

हरीष ऊर्फ हरीनाथ सुबराव बिरंगळ, (रा. सोनेगांव, ता. जामखेड) व महेंद्र अभिमान मोहळकर, (रा. नान्नज, ता. जामखेड) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांचे नाव आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे तसेच फरार व पाहिजे असलेल्या आरोपी बाबत माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, गावठी कट्टा व जिवंत काडतुस जवळ बाळगणारे दोन इसम नान्नज शिवारातील नंदादेवी हायस्कुल, ता. जामखेड येथे येणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी जामखेड-नान्नज रोडवरील, नान्नज शिवारातील नंदादेवी हायस्कुल, ता. जामखेड येथे जावून वेशांतर करुन सापळा लावला.

थोड्याच वेळात माहिती मधील वर्णना प्रमाणे दोन इसम संशयीतरित्या फिरताना दिसले. पोलीस पथकाची खात्री होताच पथक संशयीतांना ताब्यात घेण्याच्या तयारीत असतांनाच त्यांना पोलीस पथकाची चाहूल लागताच ते पळून जावू लागले. पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्यांचा पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेतले.

त्यांची अंगझडती घेतली असता हरीष बिरगंळ याच्या कडे एक गावठी बनावटीचा कट्टा व महेंद्र मोहळकर याचे अंगझडतीध्ये चार जिवंत काडतूस मिळून आले.

पथकातील पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलिस हवालदार विश्वास बेरड, बापुसाहेब फोलाणे, दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोलिस नाईक शंकर चौधरी, भिमराज खर्से, पोलिस शिपाई विनोद मासाळकर, योगेश सातपुते, चालक हवालदार संभाजी कोतकर व भरत बुधवंत यांनी ही कारवाई केली.

एकूण ३१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस हवालदार विश्वास अर्जुन बेरड स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी जामखेड पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन जामखेड पोलीस स्टेशन गु.र.नं. ११८/२३ आर्म ॲक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व पुढील कायदेशिर कार्यवाही जामखेड पोलिस करीत आहेत.

आरोपी महेंद्र अभिमान मोहळकर हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्या विरुध्द यापुर्वी अहमदनगर जिल्ह्यात जबरी चोरी व गंभीर स्वरुपाची दुखापत करणे असे एकुण ५ गुन्हे दाखल आहेत. हरीष ऊर्फ हरिनाथ सुबराव बिरगंळ याच्या विरुध्द यापुर्वी अहमदनगर जिल्ह्यात दुखापत करणे असा गंभीर स्वरुपाचा एक गुन्हा दाखल आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!