घारगावात भर दिवसा घरफोडी !

प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यातील पठार भागात घरफोड्या आणि चोरीचे सत्र सुरूच आहे. बुधवारी दुपारी वाघ वस्तीवर घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम लंपास केली असल्याची घटना घडली आहे.

घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्या आणि घरफोड्यांचे सत्र सुरूच असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. शेतकऱ्यांचे विज पंप चोरणे ही नित्याची बाब झाली आहे. घरफोड्या, किरकोळ चोऱ्या, पेट्रोल पंप लुटणे अशा घटना घडत आहेत. त्यातच भर दिवसा घरफोडीचा प्रकार घारगावा हद्दीत घडला आहे.

पठार भागातील वाघ वस्ती, माळवाडी बोटा परिसरात ही घटना घडली असून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील ४५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली असल्याची फिर्याद घारगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली. आहे बुधवारी दुपारी एक ते पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. त्यामुळे चोरट्याने आता दिवसा सुद्धा घरफोड्या करून रोख रक्कम आणि दागिन्यावर डल्ला मारण्यास सुरुवात केली असल्याचे चित्र आहे.

संगीता बाळू वाघ (राहणार वाघ वस्ती, माळवाडी, बोटा तालुका संगमनेर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार लांघे हे पुढील तपास करीत आहेत.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!