मोटार सायकल चोरी करणारी टोळी संगमनेर शहर पोलिसांनी पकडली !

एका लहान मुलाचा आरोपीत समावेश 

प्रतिनिधी —

संगमनेर शहर आणि परिसरात मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. शहरात दररोज मोटरसायकल चोरी होत असल्याच्या घटना घडत होत्या. सातत्याने मोटरसायकल चोरीच्या घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता होती. संगमनेर शहर पोलिसांनी गुन्ह्यांच्या तपासात छडा लावत एका अल्पवयीन मुलासह चार जणांची मोटरसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद केली आहे.

पोलिसांना या चोरट्यांकडून ७ मोटार सायकल सह ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये संगमनेर शहर आणि सिन्नर तालुक्यातील मोटारसायकलची चोरी करण्यात आल्याचे उघड झाले आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा नव्याने चार्ज घेतलेले पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

एका अल्पवयीन मुलासह मोबीन मुबारक शेख आणि मोहम्मद फरदीन नाझीर शेख (दोन्ही राहणार रहेमत नगर, संगमनेर) सुमित संजय कदम (रा.निमगाव टेंभी, तालुका संगमनेर) येथील असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.

संगमनेर येथील गणेश नगर मध्ये राहणाऱ्या ओम दीपक जानमाळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस मोटरसायकल चोरीचा तपास करत होते. सदर मोटरसायकलच्या तपासात विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले होते. या अल्पवयीन मुलाकडे विचारपूस केली असता त्याने सदरच्या मोटरसायकल चोरीची कबुली दिली असून वरील दोन आरोपी यांना दुचाकी विकल्याची माहिती दिली. सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.

तसेच या अल्पवयीन मुलाने सिन्नर तालुक्यातील चार मोटार सायकल चोरल्याची देखील कबुली दिली असून त्या देखील वरील दोन्ही आरोपींना विकल्या असल्याचे सांगितले. या सर्व मोटार सायकल पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.

तसेच किरण रोहिदास राहणे राहणार चंदनपुरी तालुका संगमनेर यांनी सुद्धा त्यांच्या मोटरसायकल चोरीस गेल्याची फिर्याद दिली होती. अधिक माहिती घेतली असता सदर मोटरसायकल देखील याच टोळीतील अल्पवयीन मुलाने सदर मोटरसायकल निमगाव टेंभी, तालुका संगमनेर येथील सुमित संजय कदम यांच्या सोबतीने चोरी केली असल्याची माहिती देऊन सदर मोटरसायकल देखील वरील दोन व्यक्तींना विकली असल्याचे सांगितले या मोटरसायकल देखील हस्तगत करण्यात आल्या आहेत.

संगमनेर शहर आणि सिन्नर पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील सात मोटरसायकल हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या कारवाईत पोलीस निरीक्षक मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार अमित महाजन, पोलीस नाईक दत्तू चौधरी, फुरकान शेख (सायबर सेल, श्रीरामपूर) अण्णासाहेब दातीर, अमृत आढाव, सुभाष बोडके प्रमोद गाडेकर, आदींनी सहभाग घेतला होता.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!