चुलत बहिणीवर अत्याचार ; तरुणाला अटक
प्रतिनिधी —
एका तरुणाने आपल्या सख्या चुलत अल्पवयीन बहिणीवर वारंवार अत्याचार केला. त्यातून ती अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली असून तिला उपचारा साठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली असून पोलिसांनी सदर तरुणाला अटक केली आहे.

याबाबत संगमनेर तालुका पोलिसांत दाखल झालेल्या माहिती नुसार सदरची घटना संगमनेर तालुक्यातील एका गावात घडली आहे. या गावात हातावरचे पोट असणाऱ्या आणि मोलमजुरी करुन राहणार्या दोन कुटुंबातील एका वीसवर्षीय मुलाने सदरचा प्रकार केला आहे. पिडिता आरोपीची चुलत बहीण आहे.

आरोपीने आपल्या परिवारातील सतरावर्षीय अल्पवयीन मुलीला भुरळ घालून गेल्या काही महिन्यांपासून नियमित अत्याचार केला आहे. त्यातून ती अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली.
त्या मुलीचे पोट वाढल्याने सर्व प्रकार तिच्या आईच्या लक्षात आल्यानंतर त्या तरुणाचे कृत्य उघड झाले. मात्र तोपर्यंत बराच उशीर झालेला असल्याने पीडितेला तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. त्यामुळे पिडितेच्या नातेवाईकांनी तिला लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

त्यानंतर पीडित मुलीच्या आईने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात संबंधित तरुणा विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक राहुल सानप हे करत आहेत.

