संगमनेरात पुन्हा घरफोडी आणि चोरी !
सोन्याचे दागिने, मोबाईल आणि कपड्यांची लुटमार
प्रतिनिधी —
संगमनेर शहर आणि तालुक्यात गुन्हेगारांनी धुमाकूळ घातला असून घरफोड्या आणि चोऱ्यांचे सत्र दर दिवसाआड रतीब घातल्याप्रमाणे सुरू आहे.

संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुकेवाडी शिवारात घरफोडी करून चोरट्यांनी ५५ हजार रुपये किमतीच्या नवीन कपड्यांची चोरी केली आहे. तर संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात कवठे कमळेश्वर या गावात ७० हजार रुपये किमतीचे दागिने आणि मोबाईल फोन चोरट्यांनी चोरून नेले आहेत.

दोन्ही घटनांबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन्हीकडेही आज्ञाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
संगमनेरातील दरोड्याच्या घटना ताज्या असतानाच पुन्हा घरफोडी व चोरी झालेली आहे. या संदर्भात सविता विशाल गोसावी यांनी फिर्याद दिली असून सुकेवाडी येथे घरफोडी करून जीन्सच्या पॅन्ट, टी-शर्ट, वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या, वेगवेगळे प्रकारचे लहान मुलांचे ड्रेस, वेगवेगळ्या पैठणी अशा वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.

तर संगमनेर तालुक्यातील कवठे कमळेश्वर या ठिकाण बाळासाहेब नाना भडांगे यांच्या घरातून ॲपल कंपनीचा मोबाईल, एक सोन्याचे मंगळसूत्र आणि सोन्याचे कर्णफुले असे अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत.
संगमनेर शहर आणि तालुक्यात चोरट्याने घातलेला धुमाकूळ सुरूच असून चोरट्यांना पकडण्यात आणि त्यावर नियंत्रण आणण्यात पोलिसांना अपयश येत आहे.

सुकेवाडी येथील घरफोडीचा तपास पोलीस हवालदार टोपले हे करीत आहेत. तर कवठे कमळेश्वर येथील चोरीचा तपास पोलीस नाईक पालवे हे करत आहेत.

