संगमनेर शहरात दरोडा ; पाच लाखाची लुटमार !

 

संगमनेर शहर पोलिसांचा धाक पूर्णतः संपला असून गुन्हेगारीमुळे शहर असुरक्षित झाले आहे. संगमनेर शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून खून, दरोडे, घरफोडी आणि चोऱ्यांचे सत्र सुरू आहे. चोर, दरोडेखोरांच्या टोळ्या दहशत निर्माण करत असताना पोलिसांना मात्र गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यात पूर्णतः अपयश आले आहे. दोन महिन्यापूर्वी झालेल्या खुनाचा तपास अद्यापही लागलेला नाही. चोऱ्या करणाऱ्यांच्या टोळक्यांनी उच्छाद मांडला आहे. सततच्या घटनांनी संगमनेरकर भीतीच्या सावटाखाली आहे. एवढ्या घटना घडत असताना देखील संगमनेर शहर पोलीस ठाण्यात प्रभारी राज सुरू आहे. गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी खमक्या पोलीस अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. शहर आणि तालुक्यातील पोलीस दल गुन्हेगारांवर नियंत्रण आणण्यात यशस्वी झाले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संगमनेरसाठी एखाद्या कार्यक्षम अधिकाऱ्याची तातडीने नियुक्ती करावी अशी मागणी संगमनेरकरांमधून होत आहे.

 

संगमनेर शहरात दरोडा ; पाच लाखाची लुटमार !

प्रतिनिधी —

संगमनेर शहरातून जाणाऱ्या जुन्या नासिक-पुणे महामार्गालगत गुरुवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांच्या सशस्त्र टोळीने धुमाकूळ घालत पिस्तूलचा धाक दाखवून व्यापाऱ्याच्या घरातील व्यक्तींना मारहाण करत सुमारे अडीच लाखाच्या रोकड रकमेसह साडेनऊ तोळ्याचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला आहे.

शहरातून जाणारा नासिक-पुणे महामार्ग प्रचंड वर्दळीचा असून बस स्थानकापासून काही अंतरावर सह्याद्री विद्यालया शेजारी असलेल्या व्यापारी केदारनाथ भंडारी यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांच्या टोळीने हा धुमाकूळ घातला.

महामार्गापासून अवघ्या पन्नास मीटर अंतरावर पडत असलेल्या या दरोड्याची चाहूल देखील कोणाला लागली नाही. सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने भंडारी यांच्या निवासस्थानी प्रवेश केला. यावेळी घरामध्ये भंडारी यांच्या पत्नी शोभना मुलगा पार्थ आणि त्याचा मित्र प्रणव असे तिघेजण होते. दरोडेखोरांनी या तिघांनाही त्यांच्या हातातील पिस्तूल, चाकू आणि कोयत्याचा धाक दाखवत मारहाण केली. दरोडेखोरांच्या दहशतीने घाबरलेल्या शोभना भंडारी यांनी त्यांची विनवणी सुरू केली. मात्र त्यांच्या विनवणीला धुडकावत दरोडेखोरांनी घरातील कपाटामध्ये ठेवलेली दोन लाख साठ हजार रुपयांची रोकड, साडेनऊ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि विवो कंपनीचा मोबाईल भंडारी यांच्याकडून काढून घेतला.

घरातील तीनही व्यक्तींना मारहाण करून दहशत निर्माण करणाऱ्या दरोडेखोरांचा धुमाकूळ बराच वेळ सुरू असताना देखील आसपास कोणालाही याचा सुगावा लागला नाही. लुटीचा माल घेऊन दरोडेखोरांनी पोवारा केल्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी येण्यापूर्वीच पसार झालेल्या दरोडेखोरांच्या टोळीचा पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना अपयश आले.

शुक्रवारी रात्री उशिराने दोन वाजण्याच्या सुमारास शोभना भंडारी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चार चोरट्या विरोधात शहर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव पुढील तपास करत आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!