महसूल विभागाचा वाळू तस्करांना पकडण्याचा “फोटो शो” संपला !
गंगामाई घाटावर प्रवरा नदीत पुन्हा वाळू तस्करी सुरू !!
प्रतिनिधी —
प्रवरा नदी पात्रात गंगामाई घाटावर वाळू तस्करी करणाऱ्या रिक्षा आणि छोट्या गाड्या पकडण्याचा दोन दिवसाचा ” फोटो शो” केल्यानंतर महसूल विभाग नेहमीप्रमाणे “गार” पडला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून गंगामाई घाटावरून जोरदार वाळू तस्करी सुरू झाली आहे.

काही दिवसांपूर्वी संगमनेरच्या तहसील विभागाने तलाठी, मंडळ अधिकारी यांनी वाळू तस्करी करणाऱ्या रिक्षा, जीप, मारुती व्हॅन पकडल्याचे फोटो सोशल मीडिया वरून वायरल केले होते. या फोटोंमध्ये तलाठी सर्कल हे सुद्धा त्या पकडलेल्या वाहनांबरोबर चमकले होते. या वाहनांवर कारवाई सुरू असल्याचे महसूल विभागाकडून दाखवण्यात आले.

आता ही वाहने कायमस्वरूपी पकडली जातील आणि कारवाईमध्ये सातत्य राहील अशी अपेक्षा जनतेची होती. परंतु महसूल विभागाला लागलेली वेगळीच “चटक” वाळू तस्करांना पकडण्याच्या सातत्यात आडकाठी ठरली आहे.
प्रवरा नदी पात्रात जुन्या पुणे नाशिक महामार्गावरील मोठ्या पुलाच्या आसपास होणारी वाळू तस्करी, गंगामाई घाटाच्या परिसरात होणारी वाळू चोरी, कासारा दुमाला परिसरात होणारी वाळू तस्करी यात कधीच खंड पडलेला नाही.

आजही या परिसरातून मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी सुरू आहे. सिमेंटच्या रिकाम्या गोण्यांमध्ये भरलेल्या वाळूचे ढीग घाटावर आणून ठेवले जातात. तरी ते महसूलच्या अधिकाऱ्यांना दिसत नाहीत. याचे आश्चर्य वाटते. वाळू चोरांना कसलीच भीती वाटत नाही. महसूल विभाग कारवाई केल्याचे थातूरमातूर फोटो सोशल मीडियात प्रसिद्ध करून पुन्हा गार पडल्याचे चित्र दिसून आले आहे.

