सत्यजित तांबेंवर सगळ्यांचाच डोळा !
आता सत्यजितला साथ देण्याची गरज !
विशेष प्रतिनिधी —
प्रचंड नाट्यमय घडामोडीनंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी हा उमेदवारी अर्ज अपक्ष जरी दाखल केला असला तरी काँग्रेस, भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये त्यामुळे खळबळ माजली आहे. मात्र कुठल्याही पक्षात न जाता मी काँग्रेस बरोबरच आहे. महाविकास आघाडी बरोबरच आहे. अशी ठाम भूमिका सत्यजित तांबे यांनी घेतली आहे.

राजकीय वारसा असणाऱ्या युवा नेत्यांना सत्तेच्या राजकारणात संधी मिळणे अवघड असते. विशेषतः कमी वयात आणि लवकर संधी मिळणे तर अतिशय अवघड गोष्ट आहे. नगर जिल्ह्यात सहकारात तर युवकांना फार उशिरा संधी मिळालेली आहे. सत्तेच्या पदावर असणाऱ्या त्यांच्या घराण्यातील नातेवाईकांनी विशेषत: त्यांच्या वडिलांनीच युवकांची जागा, मुलाची जागा अडवल्याचे चित्र दिसून आले आहे.

राजकीय घराण्यातून आलेला मुलगा, त्याच्या घराण्यातील राजकीय नेत्यांपेक्षा चांगला काम करू शकतो. हे दाखवून देण्याची संधी सत्यजित तांबे यांना या उमेदवारीमुळे मिळाली आहे. ते या संधीचे सोने करतील अशी भावना त्यांचे समर्थक व्यक्त करतात. सत्यजित तांबे यांच्या कामाची पद्धत पाहता त्यांच्या समर्थकांच्या भावनेत तथ्य असावे असे वाटते.

युवकांना राजकारणात संधी मिळावी असे सर्वत्र बोलले जात असले तरी संधी देण्याचे हे प्रमाण मात्र सर्वत्र कमीच दिसून येते. काँग्रेस पक्षात तर युवकांना संधी मिळण्याचे प्रमाण म्हणावे तसे मोठे नाही. वर्षानुवर्षे अनेक दिग्गज नेते आपले पद सोडायला तयार नसल्याने युवकांची मोठी कुचंबना या पक्षात झालेली आहे. विशेषतः वडील काँग्रेसचे राजकीय पदाधिकारी असल्याने त्यांच्या मुलांना देखील अनेक वर्ष सत्तेच्या राजकारणात संधी मिळाली नाही.

आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी मात्र संघर्ष टाळावा आणि युवकांना संधी मिळावी यातून पक्ष हितही साधले जाईल आणि पक्षात नवीन नेतृत्व पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी धडाडीने काम करेल या हेतूने स्वतःहून बाजूला होत सत्यजित तांबे यांना मार्ग मोकळा करून दिला असावा.

आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी विधान परिषदेच्या उमेदवारी अर्ज न भरल्यामुळे अनेक उलट सुलट चर्चांना उधाण आले. पुत्र प्रेमासाठी डॉक्टर तांबे यांनी काँग्रेसने दिलेली उमेदवारी नाकारून काँग्रेसला अडचणीत आणल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे भाजपला छुपी मदत केली जात असल्याचे आरोप आणि चर्चा होत आहे.

एकंदरीत हे सर्व पाहता कोणत्याही पद्धतीने एखाद्या राजकीय पुढार्याने आपल्या मुलाला संधी दिली तर असे आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता जास्त असते.
मात्र यावर खुलासा करताना डॉक्टर तांबे यांनी स्पष्ट भूमिका घेतली असून त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, आम्ही काँग्रेस पक्षातच आहोत. आम्ही काँग्रेस पक्ष सोडलेला नाही. पक्षाशी गद्दारी करण्याचा कुठलाही प्रश्न उद्भवत नाही. फक्त तरुणांना संधी मिळाली पाहिजे, ती संधी आपण द्यायला हवी.

देशात बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, युवकांचे प्रश्न आधुनिक तांत्रिकीकरण यावर आता भूमिका घेणारे ज्येष्ठ लोक फार कमी राहिले आहेत. तरुण नेते यावर भूमिका घेतात. सत्यजित ने वेळोवेळी सुशिक्षित बेरोजगार, शिक्षकांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, आधुनिकीकरण, यांत्रिकीकरण, विकासाच्या दिशेने विविध उपक्रम अशा सर्वच बाबींना वेळोवेळी हात घातला आहे. युवक काँग्रेसच्या माध्यमातून तसे राज्यभर काम देखील केलेले आहे आणि त्याच्या कामाची कुठेतरी त्याला पावती मिळावी अशी माझी भूमिका आहे.

आमच्या पक्षाचीही तीच भूमिका होती. परंतु काही अडचणीमुळे सत्यजितला अपक्ष उभे राहावे लागले आहे, असेही डॉक्टर तांबे यांनी म्हटले आहे.
नाशिक पदवीधर मतदार संघात २००९ पासून आमदार डॉक्टर तांबे यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात काम केले. या कामाची पावती त्यांना वेळोवेळी निवडणुकीत पदवीधर मतदारांनी दिली आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेला आणि भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी काँग्रेससाठी खेचून आणला होता. आणि हा मतदारसंघ इतके वर्ष काँग्रेसच्या ताब्यात आहे.

आजही तो डॉक्टर तांबे यांच्या रूपाने तो काँग्रेसच्या ताब्यात राहिला असता. सत्यजित तांबेंच्या रूपाने तो राहील असा विश्वास डॉक्टर तांबे यांचा आहे. मतदारांना देखील हा विश्वास वाटतो. परंतु निवडणुकांच्या राजकारणा मधून उडणाऱ्या विविध अफवा यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो.

सत्यजित तांबे यांचे राजकीय काम, सामाजिक काम, सांस्कृतिक काम हे नेहमीच चर्चेचे ठरले आहे. वाखाणण्याजोगे ठरले आहे. युवकांसाठी केलेले काम, क्रीडा क्षेत्रात केलेले काम नेहमीच प्रभावी ठरले आहे. राज्यभर युवकांसाठी केलेले विविध उपक्रम असतील, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत मोठ्या संख्येने युवकांसह नियोजनात सहभागी घेऊन ही यात्रा यशस्वी करण्यासाठी देखील सत्यजित तांबे यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्यासोबत युवक काँग्रेसचा देखील मोठा वाटा आहे. त्यांच्या सहकाऱ्यांचा मोठा वाटा आहे. हे नाकारून चालणार नाही.

शिक्षकांच्या बाबतीत, पदवीधरांच्या बाबतीत सत्यजितची भूमिका स्पष्ट आहे. त्यांनी वेळोवेळी त्या पद्धतीने आपल्या कामातून तसे दाखवून देखील दिले आहे. भविष्यात पदवीधरांच्या प्रश्नासाठी लढणारा युवा नेता संपूर्ण पदवीधर मतदारसंघाला मिळणार आहे. पाच जिल्ह्यांचा हा अतिशय मोठा मतदार संघ आहे आणि या मतदारसंघात जर असे युवा नेतृत्व मिळत असेल तर तो मतदार संघाचा ही फायदा आहे.

सत्यजित तांबे यांच्या रूपाने अहमदनगर जिल्ह्याला एक नवीन नेतृत्व मिळू शकते. युवकांसाठी एक नेता एक पर्याय उपलब्ध होऊ शकतो. आणि हा पर्याय काँग्रेस आणि सहकारी पक्षांच्या सहकार्याने मिळू शकतो. त्याचप्रमाणे सत्यजित तांबे यांचे भारतीय जनता पक्षाशी असलेले संबंध आणि या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने उमेदवार न दिल्यामुळे सत्यजित तांबे यांचे या निवडणुकीतले पारडे सध्या तरी जर दिसत आहे.

असे असले तरी निवडणूक ही निवणूक असते. कोणत्याही उमेदवाराची निवडून येईल अशी खात्री देता येत नाही. मात्र मतदारांनी कोणत्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहावे हे फार महत्त्वाचे आहे. पदवीधर मतदार हा सुशिक्षित, विचारी आणि अतिशय संयमाने मतदान करत असतो. भविष्यातल्या सर्व समस्या, अडीअडचणी आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण कोणते नेतृत्व स्वीकारावे याचा विचार पदवीधर मतदार नक्कीच करतील.

सत्यजित तांबे यांचे काम महाराष्ट्रात सर्वश्रुत आहे. या मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांचे काम यात मतदारसंघातल्या पाचही जिल्ह्यातील मतदारांना माहित आहे. त्यांच्या कामाचा प्रभाव या मतदार संघात नक्कीच आहे. सध्या मिळाली तर त्याचा फायदा निश्चित होईल असे मत काही जाणकार मंडळी व्यक्त करतात. निवडणुकीच्या निकालानंतर सत्यजित वर मतदारांनी किती विश्वास ठेवला आहे हे दिसून येईलच.

