महसूल मंत्री थोरात यांच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्यातील पाझर तलाव दुरुस्तीसाठी ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर
प्रतिनिधी —
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील व वाडीवस्त्यांवरील पाझर तलावाच्या दुरुस्तीकरिता मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी दिली आहे ..
याबाबत अधिक माहिती देताना थोरात म्हणाले की, नामदार बाळासाहेब थोरात यांनी सततच्या विकास कामातून संगमनेर तालुका हा विकासाचे मॉडेल बनवला आहे. १७१ गावे व २५३ वाड्या-वस्त्यांवर सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या आहेत. रस्ते, पाणी, वीज याचबरोबर तालुक्यात मोठे साखळी बंधारे निर्माण केले आहेत.
थोरात जलसंधारण मंत्री असताना विविध नद्या, ओढे, नाले यावर मोठ्या प्रमाणात बंधारे निर्माण केल्याने तालुक्यांमध्ये बंधाऱ्याची जाळे निर्माण झाले आहे. या बंधाऱ्यामुळे त्या गावांमध्ये जलसमृद्धी निर्माण होण्यास मोठी मदत झाली आहे. या तलावांच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत देखभाल व दुरुस्ती करिता ७ कोटी रुपयांचा निधी मिळवला आहे.
यामध्ये संगमनेर तालुक्यातील कोकणगाव, मालदाड, डिग्रस, वनकुटे, क-हे, कर्जुले पठार, रणखांब, वडगाव लांडगा, घुलेवाडी, समनापुर, साकुर गायकवाड मळा, खळी, साकुर हिरेवाडी, गुंजाळवाडी, केळेवाडी, मांडवे बुद्रुक, पिंपळे, वरवंडी, डिग्रस येथील ठाकरवाडी, जाधव वस्ती, शिंदोडी, खांबे, साकुर येथील हिवरगाव शिव, घारगाव मधील बोल्हाई माता पाझर तलाव या कामांचा समावेश आहे ..
या निधीतून या पाझर तलावांची दुरुस्ती करून सिंचनक्षमता पुनर्स्थापित करण्याच्या उद्देशाने जलसंधारण उपचार व बांधकामांची दुरुस्ती होणार आहे .यामुळे या गावांमधील पाणीसाठा वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
