जिल्हाप्रमुख खेवरे यांचा पुतळा जाळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा !
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे पोलीस उपाधीक्षकांना निवेदन
प्रतिनिधी —
उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या पुतळ्याचे दहन करणाऱ्या समाज कंटकांवर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांची भेट घेत कारवाई करण्याची मागणी केली.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या होत्या. त्यामुळेच संपर्कप्रमुख बबनराव घोलप यांच्या विरोधात संगमनेर, अकोले, कोपरगाव या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला. याची दखल घेत शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी तात्काळ सर्व नवीन झालेल्या नियुक्त्यांना स्थगिती देण्यात आल्याचे पत्रक प्रसिद्ध केले.

या परिस्थितीस शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे हे जबाबदार असल्याचे मानून संगमनेरात काही युवकांनी खेवरे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. ही बाब शिवसैनिकांना न रुचल्यामुळे त्यांनी पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांना निवेदन दिले.

जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या पुतळ्याचे दहन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख जयवंत पवार, तालुका प्रमुख जनार्दन आहेर, उप जिल्हाप्रमुख दिलीप साळगट, शहर प्रमुख प्रसाद पवार, युवा सेनेचे तालुकाप्रमुख गुलाब भोसले, अमोल कवडे, शहरसंघटक पप्पूकानकाटे, उप तालुका प्रमुख सोमनाथ काळे, अशोक सातपुते, संतोष कुटे, समीर ओझा, रवी गिरी, बाळासाहेब घोडके आदींनी झालेल्या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केला.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उत्तर नगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या ज्या निवडी झाल्या. याची कुठल्याही प्रकारची कल्पना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांना नव्हती. ते देवदर्शनासाठी बाहेर गावी गेलेले होते. त्या निवडींना शिवसेनेच्या वरिष्ठ स्तरावरून स्थगिती देण्यात आली. या स्थगितीत जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांचा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नाही. त्यामुळे त्यांचा पुतळा जाळणे शिवसैनिकाला शोभत नाही. त्यामुळे असे कृत्य करणाऱ्यांवर शिवसेनेच्या वरिष्ठ स्तरा वरून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख प्रसाद पवार यांनी केली आहे.

