‘गुवाहाटी’ च्या सौदेबाजीचे बिंग फुटले !
…तर त्यांच्या घरी भांडे घासायलाही तयार !
त्यांचा खोके आणि ओके हाच पक्ष !
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
खोके सरकार सोबत असलेले अपक्ष आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात खोक्यांवरूनच जोरदार वाद पेटला असून, कडू यांनी थेट पोलीस ठाणे गाठत तक्रार देऊन रवी राणा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

‘बच्चू कडू हा तोडपाणी करणारा आमदार आहे. खोके मिळाल्यानंतरच तो गुवाहाटीला गेला होता’, असा सनसनाटी आरोप रवी राणा यांनी केला होता.

त्यानंतर मिंधे सरकारसोबत असलेल्या या दोन आमदारांमधील वाद विकोपाला गेला आहे.

कडू यांनी अमरावतीतील राजापेठ पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली आहे. रवी राणा यांनी माझी बदनामी केली आहे. राजकीय करियर करायला मला वीस वर्षे खर्च घालावी लागली आहेत. त्यामुळे मी पैसे घेऊन गुवाहाटीला गेलो असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपाला उत्तर द्यायला हवे असे कडू यांनी नमूद केले आहे.

मला पैसे दिले गेले असतील तर स्पष्ट करा अशी मागणी करणारी नोटीस मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पाठवणार असे कडू यांनी सांगितले.

दरम्यान मंत्रीपद न मिळाल्याने बच्चू कडू आधीच नाराज आहेत. त्यात फडणवीस समर्थक रवी राणा यांच्या आरोपाने कडू यांचा पारा चांगलाच चढला असून खोके सरकार मधील खदखद येत्या काळात आणखी उफाळून येण्याचे स्पष्ट संकेत यातून मिळत आहेत.

तर…त्यांच्या घरी भांडी घासायलाही तयार
रवी राणा यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. गुवाहाटीला जाण्यासाठी मी पैसे घेतले असे ते म्हणत असतील, तर त्याचे पुरावे त्यांनी द्यावेत. मी तोडपाणी केल्याचे सिद्ध झाले, तर मी त्यांच्या घरी भांडी घासायलाही तयार आहे. त्यांनी १ नोव्हेंबर पर्यंत पुरावे द्यावेत. अन्यथा लढाई आरपारची होणार हे ध्यानात ठेवावे.

खोके आणि ओके हाच पक्ष !
‘मंत्री पद सोडून असच कुणी दुसरीकडे जात का ? बच्चू कडू गुहाटीला का गेला ? याला कोणता पक्ष आहे ? याचा पक्ष एकच ‘खोके आणि ओके’. खोके घेतल्याशिवाय याचे पानही हलत नाही. हा खोके घेऊनच गुहाटीला गेला होता ; असा आरोप रवी राणा यांनी केला होता. ‘बच्चू कडू नौटंकीबाज आहे. या टीनपाटाने गुवाहाटीला जाऊन आणि सत्ताधाऱ्यांची लाळघोटेकरी करून जी संपत्ती जमा केलीय ती आधी गरिबांना वाटून दाखवावी ; असे आव्हान राणा यांनी दिले होते. यावरून हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले आहे.

(सौजन्य दैनिक सामना)
