पात्रता परीक्षेत ९६ टक्के शिक्षक नापास !
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
शिक्षक म्हणून नोकरी करण्यासाठी आवश्यक असलेली टीईटी (टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट) ही परीक्षा द्यावी लागते. २०१२१ मध्ये झालेल्या या परीक्षेचा निकाल लागला असून ९६ टक्के भावी शिक्षक चक्क नापास झाले आहेत.

शालेय शिक्षणासाठी दर्जेदार शिक्षक मिळावे यासाठी घेण्यात येत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या टीईटी निकालात अनेकांची दांडी गुल झाली आहे.

पेपर १) इयत्ता पहिली ते पाचवी गट निकाल ३.८० तर पेपर २) इयत्ता सहावी ते आठवी गट साठी झालेल्या पेपरचा निकाल केवळ ३.५६ टक्के लागला आहे.

डीटीएड होऊन शिक्षक होऊ पाहत असलेल्या या परीक्षेत सुमारे साडेतीन टक्के शिक्षक उत्तीर्ण झाले आहेत तब्बल ९६ टक्के अपात्र ठरले आहेत.

शिक्षक पदासाठी टीईटी बंधनकारक असल्याने २०१३ पासून राज्यात ही परीक्षा घेण्यात येते. कोरोनामुळे २०१९ पासून परीक्षेचे नियोजन राज्य परीक्षा परिषदेला करता आलेले नव्हते.

कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर टीईटी परीक्षा २०२१ मध्ये घेण्यात आली. मात्र या परीक्षेचा निकाल जाहीर करण्याआधीच टीईटी घोटाळा उघडकीस आला. (मंत्र्यांची पोरं वशिल्याने पास)

त्यातील गैरप्रकार केलेल्या परीक्षार्थींची नावे राज्याच्या परीक्षा परिषदेने जाहीर केली होती. २०२१ चा निकाल जाहीर होत नसल्याने ही परीक्षा दिलेले राज्यातील अनेक उमेदवार निकालाकडे डोळे लावून होते. अखेर परिषदेने निकाल जाहीर केला आहे.

- काही वर्षांपूर्वी डीएड झाले की हमखास नोकरी हे सूत्र होते. त्यामुळे डीएड प्रवेशासाठी दहावी, बारावी परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनाच तिथे प्रवेश मिळायचा. प्रचंड स्पर्धा असायची, अगदी एक गुण कमी मिळाला म्हणून अनेकांना तिथे प्रवेश मिळाला नसल्याची उदाहरणे आहेत. यात चांगला फायदा दिसतो आहे म्हणून अगदी खिरापत वाटल्यासारखे खाजगी/विनाअनुदानित डीएड कॉलेजला शेकडोंच्या संख्येने परवानग्या देण्यात आल्या.
- परिणामी मोठ्या संख्येने विद्यालये, तितक्याच मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि अगदी तुटपुंज्या नोकऱ्या हे समीकरण कसे जुळणार? अलीकडच्या काळात शिक्षकाची, त्यातही सरकारी शाळेत नोकरी मिळणे दुर्मिळ झाले आहे. त्यामुळे शिक्षण शास्त्र पदविकेसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही प्रचंड रोडावली आहे. डीटीएड विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी गुणवत्तेचा कोणताही निकष नाही. किंबहुना विद्यालय टिकावीत तिथल्या प्राध्यापकांच्या नोकऱ्या टिकाव्यात यासाठी अगदी जाहिरातबाजी करून बळेच प्रवेश दिले जातात. मग टीईटीचा निकाल असा लागणे काही आश्चर्यकारक नाही.
सुनील नवले, शिक्षक, संगमनेर

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक साठी २ लाख ५४ हजार ४२८ नोंदणी झाली होती. त्यापैकी २ लाख १६ हजार ५७९ परीक्षार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ९ हजार ६५३ पात्र झाले आहेत. पात्र टक्केवारी ३.७९ इतकी आहे.

माध्यमिक स्तरावर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन ही परीक्षा घेण्यात आली या परीक्षेत २ लाख १४ हजार २५१ परीक्षार्थींनी अर्ज भरले होते. त्यापैकी १ लाख ८५ हजार ४५९ परीक्षार्थींनी परीक्षा दिली त्यापैकी ७ हजार ६३४ पात्र ठरले आहेत. ही टक्केवारी ३.५६ इतकी आहे.

