चार भावंडांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख रूपयांच्या मदतीचे धनादेश सुपर्त
विजेच्या शॉक ने झाला होता मृत्यू
घरकुलांची मंजूरी आठ दिवसात देणार – मंत्री विखे
प्रतिनिधी —
विजवितरण कंपनीच्या निष्काळजी पणामुळे मृत्यू झालेल्या चार मुलांच्या कुटुंबियांची भेट घेवून महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्येकी चार लाख रुपयांचे धनादेश सुपर्त केले. जनसेवा फौंडेशनच्या वतीने या कुटुंबाला किराणा साहित्यही देण्यात आले. या कुटूबियांकरीता घरकुलांचा प्रस्ताव मंजूरीसाठी पाठविण्यात आला असून आठ दिवसात मंजूरीचे पत्र देण्यात येईल असेही त्यांनी आश्वासित केले.

संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी अंतर्गत असलेल्या वांदरकडा येथील नाल्यात तुटलेल्या विजवाहक तारेचा धक्का बसून अनिकेत आरूण बर्डै, ओंकार अरुण बर्डै दर्शन अजित बर्डै, विराज अजित बर्डै चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्याच दिवशी पालकमंत्री विखे पाटील यांनी याठिकाणी कुटूबियांची भेट घेवून त्यांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.

निष्काळजीपणा करणाऱ्यां अधिकाऱ्यांवर मृत्यूस कारणीभूत गुन्हा दाखल करण्यात आला होता. विखे पाटील यांच्या भेटीनंतर मुलांवर अंत्यसंस्कार करण्यात आलै होते.

चारही मुलांच्या कुटुंबियांना मदत मिळवून देण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या वतीने तसेच अन्य विभागाकडून मदत मिळावी म्हणून प्रस्ताव सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाचा मंत्री विखे पाटील यांनी व्यक्तिगत पाठपुरावा केला.

वीज वितरण कंपनीने मंजूर केलेले प्रत्येकी चार लाख रुपयांचे धनादेश मंत्री विखे पाटील यांनी कुटुंबियांकडे अकलापूर येथे स्वत येवून दिले. अन्य योजनेतील धनादेशही लवकरच या कुटुंबाला दिले जातील असे त्यांनी सांगितले.

जनसेवा फौंडेशनच्या वतीने या कुटुंबाला दिवाळी निमित्ताने किराणा तसेच उबदार कपडे देण्यात आले. शासनाच्या आनंदाचा शिध्याचे किटही या कुटुंबियांना देण्यात आले.

प्रांतधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, पोलीस निरीक्षक सुनिल पाटील विजवितरण कंपनीचे अभियंता थोरात यांच्यासह ॲड. बापुसाहेब गुळवे,ॲड. श्रीराम गणपुले, जावेद जहागिरदार डाॅ.सोमनाथ कानवडे, सतिष कानवडे, अमोल खताळ किशोर डोके, जनार्दन आहेर राहूल भोईर, संजय देशमुख साहेबराव वलवे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मंत्री विखे पाटील म्हणाले की, घडलेली घटना अतीशय दुर्देवी आहे. चार निरपराध मुलांच्या मृत्यूची घटना अतिशय दुर्दैवी असून कोणत्याही मदतीने भरून येणार नाही. निश्चितच विजवितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा यामध्ये निष्काळजीपणा कारणीभूत ठरला. परंतू या कुटूबांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. सरकार संवेदनशील असल्यामुळेच मदतीचे धनादेश तातडीने दिले गेले.अन्य मदत मिळण्यासाठी मी व्यक्तिगत पाठपुरावा करणार असून घरकुलांचे प्रस्ताव सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला तातडीने मंजूरी देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

