सामाजिक बांधिलकी आणि श्रमनिष्ठा निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना महत्वाची — प्रा.डॉ. मारुती कुसमुडे
प्रतिनिधी —
महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांच्या मनात श्रमनिष्ठा, सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्यासाठी आणि त्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्याच्या दृष्टिकोणातून राष्ट्रीय सेवा योजना अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते असे प्रतिपादन प्रा.डॉ. मारुती कुसमुडे यांनी केले.

शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिना निमित्त आयोजित व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड, उपप्राचार्य डॉ.राजेंद्र ढमक, पर्यवेक्षक प्रा.आप्पासाहेब गुंजाळ, राष्ट्रीय सेवा योजना समितीचे कार्याध्यक्ष प्रा.संदिप वलवे आदि उपस्थित होते.

पुढे ते म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सेवावृत्ती निर्माण करण्याचे आणि मानवी मूल्ये जोपासण्याचे महत्वपूर्ण कार्य केले जाते.

सेवा, त्याग, नैतिकता, श्रमप्रतिष्ठा, नेतृत्व संघटन, प्रयोगाशीलता, स्वावलंबन, स्वयंशिस्त, चारित्र्य आशी विविध गुणांचा विकास राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध उपक्रमांद्वारे साध्य होण्यास मदत होते.

विद्यार्थ्यांमधे राष्ट्रीय एकात्मतेची भावना, राष्ट्राप्रति आदर निर्माण होवून त्यास सामुहिक आणि सहजीवन जगण्याची, जीवनामधे स्वतःला ओळखण्याची, आपल्या क्षमतांनुसार घडण्याची दृष्टि प्राप्त होते.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना ही एक बिन भिंतींची शाळा असून स्वयंसेवकांवर समाजसेवा करणे, सामाजिक बांधिलकी निर्माण करणे, रचनात्मक कार्य करणे, लोकशाही प्रवृत्तीचा विकास करणे असे विभिन्न संस्कारशील उपक्रम राबविण्याचे हे एक व्यासपीठ आहे.

श्रमप्रतिष्ठा, नम्रता, विनयशीलता या गुणांनी स्वयंपूर्ण झालेल्या या विद्यार्थ्यांना जीवनात नवी दिशा, नवीन शोध क्षमता प्राप्त होते. म्हणुनच आपला देश बलशाली करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना अत्यंत महत्वपूर्ण आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.संदिप वलवे व अतिथींचा परिचय प्रा.नितेश सातपुते यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.यशवंत भांगरे यांनी केले. कार्यक्रामाला मोठ्या संख्येने शिक्षक वृंद, शिक्षकेतर सहकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

