थोरात साखर कारखान्यास राष्ट्रीय पातळीवरचा उत्कृष्ट ऊस विकासचा पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी —
संपूर्ण देशातील सहकारी साखर कारखान्यांसाठी मापदंड ठरलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून राष्ट्रीय पातळीवरील ऊस विकास बद्दलचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना अध्यक्ष ओहोळ म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखान्याने कायम सभासद ऊस उत्पादक व कामगारांचे हित जोपासताना इतर सर्व सहकारी साखर कारखाने व इतर सहकारी संस्थांसाठी दिशादर्शक काम केले आहे. यावर्षी कारखान्याने १५ लाख ५३ हजार मे.टनाचे विक्रमी गाळप केले असून या कारखान्याला विविध राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पुरस्कार मिळाले आहेत. नुकताच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ मर्यादित नवी दिल्ली यांच्या वतीने सन २०२१-२२ या वर्षातील ऊस विकास विभागातील उत्कृष्ट ऊस विकासाची द्वितीय पारितोषिक जाहीर झाले आहे. या पुरस्कारासाठी देशभरातील साखर कारखान्यातून आलेल्या प्रस्तावाची छाननी केंद्र शासनाचे चीफ डायरेक्टर ऑफ शुगर नवी दिल्ली यांच्या अध्यक्षतेखाली केली जाते. त्यातून पहिले तीन कारखान्यांना पुरस्कार जाहीर केले जातात.

काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखान्यास दरवर्षी वेगवेगळ्या संस्थांचे पुरस्कार मिळत असतात. ऑगस्ट २०२२ मध्ये शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन नवी दिल्ली या संस्थेचा उत्कृष्ट उद्योजगता पुरस्कार या कारखान्याचे कार्यकारी संचालक जे. बी. घुगरकर यांना प्राप्त झालेला आहे.

थोरात कारखान्याला स्वर्गीय सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या शिस्तीमुळे नैसर्गिक परिस्थिती अनुकूल नसतानाही हा कारखाना सतत उच्चांकी ऊस गाळप. रिकव्हरी मिळवत आलेला आहे. गत हंगामात या कारखान्याने १५ लाख ५३ हजार मे. टनाचे गाळप व १ कोटी ४५ लाख लिटरचे अल्कोहोल उत्पादन केले आहे. आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनात हा कारखाना प्रगतीपथावर असून दरवर्षी ऊस गाळपा सह इतर उत्पादनामध्ये उच्चांक प्रस्थापित करीत आहे.

थोरात कारखान्याने केलेल्या ऊस विकास कामासाठी नॅशनल फेडरेशन नवी दिल्ली या संस्थेने जाहीर झालेल्या या पुरस्कारामुळे कारखान्याचे मार्गदर्शक, चेअरमन, व्हॉ चेअरमन, सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांचे सभासद, ऊस उत्पादक, व शेतकऱ्यांनी अभिनंदन केले आहे. सदर पुरस्कार नॅशनल फेडरेशन नवी दिल्ली या संस्थेच्या वार्षिक सभेमध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या शुभहस्ते समारंभ पूर्वक प्रदान केला जाणार आहे.

