नगरपरिषदेची निवडणूक निर्भय व पारदर्शकपणे होण्यासाठी संगमनेर शहर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांची तात्काळ बदली करावी — अमोल खताळ पाटील

पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यावरील आरोपांचे पुरावे मुख्यमंत्र्यांसह गृह विभागाला दिले.
प्रतिनिधी —
महसूल मंत्री यांचे नातेवाईक असलेले आणि विविध घटनांमुळे वादग्रस्त झालेले पोलीस निरीक्षक संगमनेर शहर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांची संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ पाटील यांनी केली आहे.
प्रसिद्धीसाठी हे दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, संगमनेर शहर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख हे महसूलमंत्री यांचे नातेवाईक असल्यामुळे हितसंबंधातून त्यांनी संगमनेर येथे नोव्हेंबर २०२० रोजी पोलीस निरीक्षक, संगमनेर शहर म्हणून पदभार स्वीकारला, तेव्हा पासून देशमुख यांची वागणूक हि कॉंग्रेस पक्षाचे स्थानिक लोकप्रतिनिधी तथा महाराष्ट्राचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व त्यांच्या भगिनी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या पोषक असून ते पदाचा गैरवापर करत आहेत.

त्यांच्या बेजबाबदारपणाचा अनुभव संगमनेरकरांनी वेळोवेळी घेतलेला आहे. पोलीस गणवेशात असताना राजकीय नेत्याच्या पाया पडणे कितपत योग्य आहे ? देशमुख हे पोलीस गणवेशात (वर्दीवर) असताना, कार्यालयीन वेळेत एका खाजगी कार्यक्रमप्रसंगी तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या पाया पडले आहेत. मागील १० वर्षापासून तांबे या संगमनेर नगरपालिका नगराध्यक्ष व नगरसेविका राहिलेल्या आहेत. आणि लवकरच संगमनेर नगरपरिषद निवडणूक होणार आहेत. जर पोलीस अधिकारी वर्दीवर तांबे यांच्या पाया पडत असेल तर भविष्यात होणारी संगमनेर नगपरिषद निवडणूक पारदर्शी कशी होऊ शकते ?

कोरोना महामारी प्रसंगी देशमुख हे (एम एच १७ सी एम ११८९ या क्रमांकाच्या) महिंद्र कंपनीचे बोलेरो हे वाहन वरिष्ठांची परवानगी न घेता अंदाजे ६ महिने मोफत वापरत होते. ते वाहन महसूलमंत्री यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना यांच्या मालकीचे आहे. ५ जून २०२१ रोजी पेमगिरी येथे मंत्री थोरात यांची मुलगी व जावई (कुठेलेही शासकीय पद नसलेले) यांनी आयोजित केलेल्या एका वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी देशमुख उपस्थित होते. विशेष म्हणजे पेमगिरी हे गाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. याचा अर्थ असाच होतो कि, देशमुख हे पूर्णता मंत्री थोरात यांच्या प्रभावाखाली संगमनेर शहर हद्दीत काम करत आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी नगर जिल्ह्यात कुठल्याही पोलीस ठाणे अंतर्गत लाचखोरी झाल्यास त्यास सर्वस्वी त्या पोलीस स्थानकाचे प्रभारी अधिकारी जबाबदार राहून त्यांना मुख्यालयातील नियंत्रण कक्षात बोलावून इतर ठिकाणी पदभार दिला जात होता. याप्रमाणे संगमनेर व अकोले येथील पोलीस कर्मचारी लाचलुचपत विभागाने पकडल्यामुळे पोलीस अधीक्षक यांनी संगमनेरचे देशमुख व अकोले येथील परमार या अधिकाऱ्यांची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली केली. परंतु यामध्ये सुद्धा महसूलमंत्री यांचा राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळे देशमुख यांना पुन्हा संगमनेर शहर पोलीस स्टेशनचा कार्यभार दिला गेला, परंतु अकोले येथील परमार यांना नियंत्रण कक्षातच नियुक्ती दिली गेली.

पोलीस निरीक्षक देशमुख यांच्यावरती महसूलमंत्री थोरात व माजी नगराध्यक्षा तांबे यांचा मोठा प्रभाव असल्यामुळे संगमनेर येथे होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पारदर्शी होण्याची शक्यता कमी आहे. निवडणूक कालावधीत देशमुख हे पदाचा गैरवापर करून मंत्री थोरात यांच्या विरोधकांना त्रास देऊन खोटे गुन्हे दाखल करणे, पोलिसांच्या मदतीने मतदारांवर दबाव टाकणे, मतदान प्रक्रीयेमध्ये फेरफार करून त्यांचा फायदा मंत्री थोरात व त्यांच्या भगिनी तांबे यांना करून देण्याची दाट शक्यता असल्यामुळे निवडणूक निपक्ष, पारदर्शी, दहशत मुक्त होण्यासाठी तक्रार केलीली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुक प्रक्रिया कर्तव्यदक्ष व नि:पक्ष अधिकारी यांच्या द्वारे हाताळणे तसेच आचारसंहिता प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मा.सर्वाच्च न्यायालयाच्या २००२ मधील निकाल नुसार राज्य निवडणूक आयोगाने २०१८ रोजी काढलेल्या आदेशानुसार संगमनेर शहर पोलीस निरीक्षक देशमुख यांची बदली होणेबाबत मी मा.निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्याकडेसर्व पुराव्यांसह तक्रार केलेली आहे. निवडणूक आयोगाने देशमुख यांची तत्काळ बदली केली नाहीतर मला नाईलाजस्तव न्यायालयात आयोगा विरोधात दाद मागणी लागेल. असा इशाराही खताळ यांनी निवेदनात दिला आहे.
