अशी स्नेहाची सावली पुन्हा मिळणे नाही !

प्राध्यापिका स्नेहजा रुपवते यांचा आज स्मृतिदिन. सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात उत्तुंग काम करणाऱ्या विशेषतः ग्रामीण भागातील बहुजन समाजाच्या मुलांच्या शिक्षणासाठी आयुष्यभर धडपडणार्या स्नेहजाताई या सर्वश्रुत आहेत. त्यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त येथील सिद्धार्थ हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक हिरालाल पगडाल यांनी लिहिलेला लेख.
हिरालाल पगडाल
प्रा. स्नेहजाताई रुपवते यांचा आज स्मृतिदिन. बाबुजीं पाठोपाठ त्यांचे अपघाती झाले. हे सारे धक्कादायक होते. त्यांचे अकाली अचानक जाणे आपल्या सर्वांचा काळजाचा ठोका चुकवून गेले. सारे काही अनपेक्षित घडले आणि आम्हा सर्वांच्या भावविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली.

प्रेमानंदजी आणि स्नेहजाताई यांनी आंतरजातीय, आंतरधर्मीय, रूढ अर्थाने आंतरवर्णीय विवाह केला. त्यांच्या विवाहाने महाराष्ट्रातील प्रस्थापित पारंपरिक विवाहाच्या कल्पनांना जोरदार धक्का बसला. त्यांच्या सहजीवनाच्या साडेचार दशकात उभयतांनी प्रेम आणि स्नेह यांची मनमुराद उधळण केली. साहित्य ,कला, शिक्षण क्षेत्रातील हजारो माणसे जोडली, त्यांना प्रेमाने जिंकले ,त्यांच्याशी आयुष्यभर स्नेहबंध जपले. स्नेहजाताई दर राखी पौर्णिमेला मला न चुकता राखी पाठवत होत्या आणि मी देखील ती राखी प्रेमाने बांधून स्नेहबंध जपत होतो. स्नेहजाताई जश्या माझ्या राखी भगिनी होत्या तश्याच राज्यातील माझ्यासारख्या अनेक पुरोगामी कार्यकर्त्यांच्या राखी भगिनी होत्या.
स्नेहजाताई यांचे स्मितहास्य एवढे लाघवी आणि निरागस असे की, त्यांना भेटायला आलेल्या माणसाचे निम्मे दुःख दैन्य त्या स्मितहास्यानेच पळून जात असे. त्यांचे व्यक्तिमत्व एवढे लोभस होते की ते पहिल्याच भेटीत समोरच्या व्यक्तीला आपलेसे करीत असत.

दादासाहेब रुपवते यांच्या सारख्या बहुसांस्कृतिक कुटुंबात स्नेहजाताईंनी स्वतःचे विशेष स्थान निर्माण केले. स्नेहजाताई मराठीच्या प्राध्यापिका होत्या, त्यांचा मराठी साहित्याचा दांडगा व्यासंग होता. त्यांचे चौफेर वाचन होते. ते अभ्यासु आणि बहुश्रुत होते. संगीत, साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान,विविध धर्म आणि संस्कृती याबाबत सखोल अभ्यास होता.
स्नेहजाताईनी सासर व माहेरच्या सार्वजनिक कार्याचा वारसा समर्थपणे पुढे चालवला. वडील आणि सासरे मंत्री असूनही स्नेहजाताईंनी नोकरी केली त्यांच्या नोकरीमुळेच बाबूजींच्या कुटुंबाचा अर्थार्जनाचा प्रश्न सुटला,संसार सुरळीत झाला. बाबूजींच्या आजारपणाच्या काळात स्नेहजाताई त्यांच्या पाठीशी सावलीसारख्या उभ्या राहिल्या, बाबूजींना आनंदाने जगण्याची उभारी दिली.

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत बाबूजी शिर्डी मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढले.या निवडणुकीत जे क्लेशदायक अनुभव आले त्याने स्नेहजाताई व्यथित झाल्या, त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी एक छोटेखानी पुस्तिका प्रसिध्द केली आणि त्यात आपल्या व्यथा,वेदना स्पष्टपणे मांडल्या.
स्नेहजाताईंचे व्यक्तिमत्व लोभस, प्रसन्न,रुबाबदार होते.त्यांचे चेहऱ्यावर सतत स्मितहास्य असे. त्या स्मितहास्याला निर्मळता आणि पवित्रतेची जोड होती.
स्नेहजाताईंनी कुसुमताई चौधरी महिला कल्याणी या संस्थे मार्फत मुंबईतील झोपडपट्टीतील उपेक्षित मुलांसाठी खूप मूलभूत स्वरूपाचे काम केले आहे. याच संस्थे मार्फत अनेक नवोदित महिला साहित्यिकांना प्रोत्साहन देणारे अनेक उपक्रम राबवले गेले.

वसतिगृहातील मुलींच्या सुखदुःखात त्या थेट सहभागी होत्या. या मुलींना त्यांचा एवढा लळा लागला होता की त्या सगळ्या मुली स्नेहजाताईंना आईच म्हणत. त्या खऱ्या अर्थाने या मुलींचे आईपण निभावत होत्या.
स्नेहजाताईंच्या जाण्याने शेकडो मुले मुली दुःखी झाले, पुरोगामी चळवळीतील असंख्य कार्यकर्ते दुःखी झाले. बहुजन शिक्षण संघ परिवार दुःखी झाला, मुंबईतील चेतना परिवार दुःखी झाला. पण कोणीही समतेची लढाई सोडून पळाले नाही. उपेक्षित बहुजनांना न्याय मिळेपर्यंत ही लढाई चालूच राहील. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ध्येय उराशी बाळगून बाबुजी आणि सूलुताई यांनी दिलेली ‘प्रेम’ ‘आनंद’ ‘स्नेह’ याची शिदोरी राखून ठेवू या. स्नेहजाताईंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !
– हिरालाल पगडाल, संगमनेर .
