सबस्टेशनमुळे पठार भागात वीज पुरवठा सुरळीत — महसूल मंत्री थोरात

पठार भागातील खांबे येथे वीज उपकेंद्र सुरू
प्रतिनिधी —
राज्यात महाविकास आघाडी सरकार अत्यंत चांगले काम करत आहे. संगमनेर तालुका विस्ताराने मोठा असूनही सातत्याने विविध विकास कामांसाठी निधी मिळवला आहे. पठार भागात वीज पुरवठा सुरळीत व्हावा याकरता खांबे येथे नव्याने सुरू झालेल्या ३३ केव्ही सबस्टेशन मुळे या परिसरातील नागरिकांना नक्कीच लाभ होणार असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

खांबे येथे विद्युत महावितरणच्या वतीने उभारलेल्या ३३ केव्ही सब स्टेशन व विविध विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी शंकर खेमनर होते तर व्यासपीठावर डॉ. जयश्री थोरात, सभापती मिरा शेटे, उपसभापती नवनाथ अरगडे, पंचायत समिती सदस्य किरण मिंडे, तुकाराम दातीर, सरपंच रवींद्र दातीर, राजेंद्र चकोर, इंद्रजीत खेमनर, जयराम ढेरंगे, सचिन खेमनर, महावितरणचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात, अधीक्षक अभियंता सुनील काकडे, अधीक्षक अभियंता इन्फ्रास्ट्रक्चर संजय खंदारे, दीपक कुमठेकर, प्रांतअधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आर .आर .पाटील, गटविकास अधिकारी अनिल नागणे, माधव दातीर, यशोधन कार्यालयाचे विजय हिंगे यांसह पठार भागातील विविध कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर तातडीने दोन लाख रुपयां पर्यंतची कर्जमाफी केली. कोरोना संकटा मुळे राज्याची आर्थिक परिस्थिती थोडी अडचणीची झाली तरीही कोरोना संपल्यानंतर लगेचच संगमनेर तालुक्यात सातत्याने विकास कामांसाठी मोठा निधी मिळाला आहे. या मधून विकास कामाची घोडदौड सुरू आहे.
संगमनेर तालुका हा विस्ताराने खूप मोठा आहे तरी ही सर्व सहकारी संस्था अत्यंत सक्षम असल्यामुळे ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी निर्माण झाली आहे. याच बरोबर कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. तालुक्यातील जनतेच्या प्रेमामुळे आपण राज्यपातळीवर काम करत आहोत. गावागावात विकास कामांचा वेग कायम राहील मात्र आपण आपल्यातील मनभेद दूर केले पाहिजे. गावात वेगवेगळ्या संस्थांच्या निवडणुका होतात मात्र निवडणूका झाल्या की तातडीने सर्वांनी गावच्या विकासकामांसाठी एकत्र आले पाहिजे.

संगमनेर तालुक्याला वसुलीची १०० टक्के परंपरा आहे. जिल्हा बँकेचे पिक कर्ज वसुलीत संगमनेर तालुका कायम आघाडीवर आहे. विद्युत विभाग आणि एसटी महामंडळ हे जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याचे विभाग आहेत. वाढत्या उन्हामुळे राज्यभर विजेची मोठी मागणी वाढली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तातडीने वीज खरेदी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. प्रत्येक कुटुंबाला विजेची गरज असून नागरिकांनीही विज बिल वेळोवेळी भरावे असे आवाहनही त्यांनी केले .

यावेळी डॉ. जयश्री थोरात, शंकर खेमनर, माधव दातीर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महावितरणचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांनी केले सूत्रसंचालन सरपंच रवींद्र दातीर यांनी केले.
यावेळी खांबा, वरवंडी आजू बाजुच्या गावांमधील नागरिक, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
