नोव्हेंबरपर्यंत निळवंडेच्या दोन्ही कालव्यांना पाणी सोडण्याचा प्रयत्न — महसूलमंत्री थोरात

म्हाळादेवी येथील निळवंडे जलसेतूचे काम प्रगतीपथावर 

प्रतिनिधी —

दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यावरील मोठ्या जलसेतूच्या कामाच्या पहाणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी  केली असून या जलसेतू सह सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. येत्या ऑक्टोंबर नोव्हेंबर पर्यंत कालव्यांना पाणी सोडण्याचा विचार असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांशी बोलताना सांगितले. अशी माहिती यशोधन कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथे उजव्या कालव्यावरील भव्य दिव्य जलसेतू (ॲक्वाडक्ट) ची पाहणी थोरात यांनी केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे, सिताराम गायकर,जि. प. सदस्य रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, मीनानाथ पांडे, दादा वाकचौरे, अशोक भांगरे, भास्कर आरोटे, बाळासाहेब नाईकवाडी, नाशिकचे मुख्य अभियंता डॉ. संजय बेलसरे,अधीक्षक अभियंता अरुण नाईक, कार्यकारी अभियंता प्रमोद माने यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

थोरात यांनी म्हाळादेवी येथील जलसेतू व उजव्या कालव्यावरील  रात्रंदिवस सुरू असलेली मशनरी, यंत्रणा याबाबतचा आढावा घेऊन त्यांच्या अडचणी समजावून घेत हे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. तसेच या भागातील शेतकऱ्यांच्या समस्या ही समजून घेतल्या. क्रेनच्या साह्याने अधिकाऱ्यांसमवेत जेलसेतूवर जाऊन नामदार थोरात यांनी ही पाहणी केली.

याबाबत निळवंडे धरणाच्या विश्रामगृहावर अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. थोरात म्हणाले की, उजव्या व डाव्या दोन्ही कालव्यांची कामे रात्रंदिवस सुरू आहेत. येत्या ऑक्टोबर- नोव्हेंबर च्या काळामध्ये दोन्ही कालव्यांना पाणी सोडता येईल याकरिता आपल्या सर्वांना काम करायचे आहे. अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनीही  या कालव्याच्या कामासाठी कायम सहकार्य केले आहे. शासन स्तरावर काही अडचणी असल्यास आपण ती प्राधान्याने सोडवू. दुष्काळी भागातील जनतेला लवकरात लवकर पाणी देणे  हा आपल्या जीवनाचा ध्यास आहे.

यावेळी कार्यकारी अभियंता प्रमोद माने यांनी सुरू असलेल्या कामाची माहिती दिली

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!