संगमनेर शांतता समिती बैठकीवर बहिष्कार !

सदस्य व नागरिक न आल्याने बैठक रद्द !!

पोलीस अधीक्षक वाट पाहून निघून गेले…

संगमनेरातील पोलीस अधिकाऱ्यांनी बद्दल प्रचंड नाराजी !

प्रतिनिधी —

रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहर पोलिसांनी आयोजित केलेल्या शांतता समितीच्या बैठकीवर संगमनेरकरांनी बहिष्कार घातल्याने आजची शांतता समितीची बैठक बारगळली आहे. नगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील सभेसाठी संगमनेर मध्ये हजर झाले होते. मात्र बराच वेळ वाट  पाहून कोणीही बैठकीला न आल्याने अखेर त्यांना बैठक न करताच काढता पाय घ्यावा लागला आहे.

संगमनेर शहरातील पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख आणि पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांच्या वर्तणुकीमुळे आणि कारभारामुळे संगमनेर शहराची शांतता व सुव्यवस्था बिघडली असून अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे समाजात नाराजीचे वातावरण पसरले असल्याने आम्ही शांतता समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला असल्याच्या प्रतिक्रिया हिंदू मुस्लीम समाजातील नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याकडून ऐकण्यास मिळाल्या आहेत.

ज्या पोलिस अधिकाऱ्यांमुळे शहराची शांतता कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे अशा पोलिस अधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीला आम्ही जाणार नव्हतो. आमचा शांतता समितीच्या बैठकीवर बहिष्कार आहे. अशी प्रतिक्रिया भाजपचे संगमनेर शहराध्यक्ष  ॲड. श्रीराम गणपुले यांनी दिली आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या वतीने अगामी रमजान ईद सणाच्या पार्श्‍वभूमीवर आज जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक बोलावली होती. ही बैठक सायंकाळी ४ वाजता सुरू होणार होती. परंतु या बैठकीवर संगमनेर शहरातील नागरिकांनी बहिष्कार घातल्याने ही बैठक रद्द करण्यात आली आहे.

याबद्दल बोलताना गणपुले म्हणाले की, आंबेडकर जयंतीच्या दिवशी संगमनेर शहरात सलोख्याचे वातावरण असताना देखील जे काही गालबोट लागले त्यास संगमनेर शहर पोलीसच जबाबदार आहेत असा आरोप करीत संगमनेर शहरातील जनतेला शांतता कशी ठेवायची हे समजते मात्र पोलिसांनी आपल्या कृतीतून आणि वागण्यातून ही शांतता बिघडवू नये असा प्रयत्न पोलिसांकडून होत असतो असा आरोप देखील गणपुले यांनी केला आहे.

आज जिल्हा पोलीस प्रमुख संगमनेरात आलेले असताना व त्यांच्या उपस्थितीत होणारी शांतता कमिटी बैठक का रद्द झाली याबाबत पोलीस विभागाने आत्मचिंतन करून शहर पोलीस निरीक्षक यांच्या मनमानी व भ्रष्ट कामकाज पद्धतीमुळे तर संगमनेरला कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होत आहे का ? याबाबतही विचार करावा. जिल्हा पोलीस प्रमुख साहेब संगमनेरचे पोलीस निरीक्षक यांच्या मनमानीकडे थोडे गांभीर्याने पाहा. राजकीय अट्टहासापोटी संगमनेरच्या कायदा सुव्यवस्थाकडे दुर्लक्ष करू नका. संगमनेरकरांना असे अधिकारी नकोच. अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी दिली आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी मिरवणुकीत जे काही गालबोट लागले त्यानुसार पोलिसांनी जे गुन्हे दाखल केले आहेत त्या गुन्ह्यातील बरीच कलमे चुकीची आहेत. त्या चुकीच्या कलमांमुळे समाजामध्ये नाराजी पसरलेली आहे. आणि अधिकाऱ्यांच्या अशा वागणुकीमुळे शहरात शांतता व सुव्यवस्था राहील की नाही याबाबत शंका वाटते. संगमनेरचे लोकप्रतिनिधी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची जबाबदारी आणि कर्तव्य आहे की, त्यांनी अशा नाजूक प्रसंगात गांभीर्याने लक्ष घालून ही समस्या सोडवण्याची गरज आहे. परंतु अधिकारी त्यांच्या मर्जीतले असल्याने असे होताना दिसत नाही. एकंदरीत सर्व घटना आणि घडामोडी पाहता पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सर्व स्तरातून नाराजी व्यक्त होत असताना महसूल मंत्र्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अशी प्रतिक्रिया माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागिरदार यांनी दिली आहे.

मी शांतता समितीचा सदस्य आहे. असे असताना देखील शांतता समितीच्या बैठकीचे  मला कोणतेही अधिकृत निमंत्रण मिळाले नाही. बैठकीला बोलावले नाही. मात्र बैठकीच्या दिवशी संगमनेर पोलिसांनी मला नोटीस बजावण्याचे काम मात्र केले आहे. शांतता कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या, नाहीतर तुमची तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू असा दम या नोटिशीचा माध्यमातून मला देण्यात आला आहे. त्यामुळे शांतता नेमकी कोण बिघडवत आहे ? याचे पोलिसांनी आत्मपरीक्षण करायला हवे. असे शांतता बिघडवणारे पोलीस अधिकारी संगमनेरात काय कामाचे ? अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक कैलास वाकचौरे यांनी दिली आहे.

व्यक्तिगत कामानिमित्त मी बाहेर गावी आहे. त्यामुळे मी शांतता समितीच्या बैठकीला येऊ शकलो नाही. बैठक रद्द झाल्याचे मला समजले आहे. त्यामुळे संगमनेर मध्ये आल्यानंतर वस्तुस्थितीची माहिती घेऊन त्या संदर्भात मी प्रतिक्रिया देईल. असे संगमनेर शहर काँग्रेसचे अध्यक्ष विश्वास मुर्तडक यांनी सांगितले.

शांतता समितीच्या बैठकीला मी गेलो होतो. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर त्याठिकाणी कोणीही आले नाही. नगरपालिकेत काही कार्यक्रम असल्यामुळे काही लोक येऊ शकले नाही अशी माहिती समजली. त्यामुळे आम्ही तिथून निघून गेलो. पोलीस अधीक्षक मनोज पाटील आलेले असल्याचे समजल्याने त्यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी शहरातील शांतता व सुव्यवस्था याविषयी विचारले असता शहरात शांतता असल्याचे आपण त्यांना सांगितले असल्याची प्रतिक्रिया संगमनेर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष निखील पापडेजा यांनी दिली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!