आटपाट नगरीची झाली लूटपाट नगरी ! 

रस्त्यावर आली सोन्याच्या आंब्यांची झाडे !!

आटपाट नगरीच्या सुरस कथा आपण ऐकल्या आहेत. वाचल्या आहेत. आटपाट नगरीचे महाराज, प्रधान, युवराज, जनपालिकेचे अध्यक्ष, महाराजांचे सगळे सगे सोयरे, महाराजांचे बंधू या सर्व मंडळींच्या विविध कारनाम्यांच्या सुरस कथा आटपाटनगरात नेहमीच घडत असतात.

सध्या या सुसंस्कृत आणि संस्कारित आटपाट नगरीत लुटमारीचा, ठेकेदारीचा, टेंडर गोळा करण्याचा नवीन प्रताप महाराजांच्या सग्या सोयाऱ्यांनी सुरू केला असल्याचे उघडकीस येत आहे. खास लूटमार करण्यासाठीच आपल्या बंधू राजांना महाराजांनी सत्तेच्या परिघात आणून बसवले. याची चर्चा आता आटपाट नगरीची रयत करत आहे.

आटपाट नगरीचे महाराज हे सर्वेसर्वा असले तरी काही वर्षांपासून आटपाट नगरीसह सहकाराच्या दुकानदारीवर आणि कारभारात लक्ष ठेवण्यासाठी महाराजांनी आपल्या एका लाडक्या बंधू राजाला सत्तेच्या खुर्चीवर आणून बसवले. नगरीत कुठलेही सामाजिक कार्य नसलेला, कोणत्याही प्रश्नांमध्ये सर्वसामान्यांसाठी न लढलेला असा हा बंधुराज निव्वळ अंध बंधू प्रेमापायी नगरीच्या रयतेच्या, शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या, कामगारांच्या, विविध संस्थांच्या ‘ उरावर ‘ आणून बसवला आहे.

आटपाट नगरीच्या साखर कारखान्याची सत्ता या बंधू राजाच्या खुर्ची खालूनच चालते. सहकारात असलेल्या विविध संस्थांवर जरी महाराजांचे अनेक चमचे, प्यादे पदाधिकारी म्हणून बसले असले तरी हे बंधूभाऊ त्या सर्वांचे रिमोट कंट्रोल आहेत. आटपाट नगरीच्या विविध संस्थांच्या पदावर असणारे हे ‘ हरकामे गडी ‘ महाराजांच्या बंधूभाऊंच्या आज्ञां पुढे जात नाहीत. महाराज नसताना या ठिकाणी येणारा महसूल गोळा करण्याचे काम हा बंधूभाऊ मोठ्या मजेत आणि जोरात करत आहे.

आटपाट नगरीचे आणि नगरीच्या बाहेरच्या राज्यांचे विविध प्रकारचे ठेके घेणे, रस्त्यांची कामे घेणे, इमारतींचे कामे घेणे, साखर कारखान्यातील कामे घेणे, जमीन खरेदी करणे, विविध ठिकाणी बिल्डर्स म्हणून काम करणे, आटपाट नगरीचा ‘ मुळशी पॅटर्न ‘ राबवणे असे सर्व प्रकार, अनेक उद्योग हे बंधुराज महाराजांच्या या छत्र छाये खाली आरामात करत आहेत.

आटपाट नगरीच्या ‘ महसूलातला वसूल ‘ गोळा करण्याचे काम हे बंधुराज मोठ्या इमाने-इतबारे करत आहेत. कुठलेही कार्य नसताना, कुठलेही सामाजिक काम केलेले नसताना, कुठलाही जनाधार नसताना आटपाट नगरीच्या ‘ बोकांडी ‘ बसवलेला हा बंधूभाऊ आटपाट नगरीत विविध उद्घाटने, वाढदिवस, कार्यक्रम करत फिरत असतो.

लाभार्थ्यांची एक मोठी टीम त्याच्या भोवती पिंगा घालत असते. हे सर्व भटके जिकडे-तिकडे उदो उदो करणारे आहेत. या भाऊ कडून मोठा लाभ मिळत असल्याने अनेक चमचे, प्यादे भाऊं भोवती जोरात लेझीम खेळत असतात. अशी आटपाट नगरी ची कथा आणि व्यथा आहे.

सध्या आटपाट नगरी आणि आटपाट नगरीच्या राज्यात आंब्यांचा मोठा सिझन चालू आहे. जिकडे तिकडे आंबे – आंबे अशी चर्चा सुरू आहे. म्हणूनच या आटपाट नगरीच्या बंधू राजांना अचानक आंबे खाण्याची इच्छा झाल्याने त्यांनी आटपाट नगरी पासून जवळच असणाऱ्या एका गावात तातडीने जमीन विकत घेऊन मोक्कार आंब्याची झाडे लावली आहेत. आता या आंब्याच्या झाडांपासून भरपूर उत्पन्न तर मिळणार आहेच, पण या झाडांमध्ये काही झाडांना सोन्याचे आंबे देखील लागणार असल्याची माहिती बिरबलाला समजली आहे. एकंदरीत महाराज “आटपाट नगरीची लूटपाट” नगरी करत असल्याचे चित्र आहे.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!