कळसुबाई – हरिश्चंद्रगड अभयारण्य, भंडारदारा पर्यटन स्थळी “थर्टी फर्स्ट” साठी कडक नियमावली !
पोलीस व वनविभागाची संयुक्त पथके आणि तपासणी नाके ठेवणार लक्ष…
प्रतिनिधी —
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटन स्थळ असलेल्या भंडारदरा येथे ३१ डिसेंबर (थर्टी फर्स्ट) साजरा करण्यासाठी अनेक उत्साही नागरिक गर्दी करत असतात. फायर कॅम्प, गिर्यारोहण, नौका विहार, नाईट कॅम्प अशा विविध ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते.

यावर्षी भंडारदऱ्याला पर्यटकांची नेहमीपेक्षा जास्त गर्दी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भंडारदरा हरिश्चंद्रगड रतनगड भैरवगड कुमशेत अशा महत्त्वाच्या निसर्ग स्थळी जाण्यासाठी राजूर येथूनच विविध रस्ते फुटतात त्यामुळे राजूर भंडारदरा येथे नव वर्षांच्या स्वागतासाठी होणाऱ्या संभाव्य गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंदा राजुर पोलिसांनी बंदोबस्ताची तयारी सुरू केली असून कायद्याचे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

राजूर पोलीस व वनविभागाच्या वतीने भंडारदरा येथे नुकतीच बैठक पार पडली. पर्यटकांच्या या गर्दीवर अंकुश मिळविण्यासाठी राजुरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे व वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ही बैठक झाली.

भंडारदऱ्याचे कापडी तंबूंचे कॅम्पिंग पर्यटकांसाठी खास आकर्षण असुन थर्टी फर्स्ट साठी सर्वात जास्त पसंती पर्यटक कॅम्पिंगसाठी देत असतात. मात्र टेंट धारकांनी तंबूमध्ये वास्तव्यास येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. नव वर्षाच्या स्वागतासाठी रात्री आणि मध्यरात्रीच्या वेळी मोठा जल्लोष असतो त्यामुळे सर्वच पर्यटकांची नोंद घेणे महत्वाचे असल्याने पर्यटकांचे आयडी प्रुफ, मोबाईल नंबर, वाहन नंबर याची सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहणी करण्यात येणार आहे. नियमांचे पालन न केल्यास कारवाई करण्यात येईल. टेंट साईटवर रात्री नऊ वाजल्यानंतर मोठ्या आवाजात संगीत वाजविण्यास निर्बंध लादण्यात आलेले आहेत.

भंडारदरा धरणाचे आणि कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील पर्यटन मागील कोविडच्या कालावधीत रोखले गेले होते. त्यामुळे स्थानिक तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न तयार झालाहोता. गत वर्षांपासून मात्र दोन्ही विभागांनी रोजगार निर्मितीस प्राधान्य देत कॅम्पिंगसाठी सर्व प्रकारचे नियम पाळून व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे.

भंडारदरा येथे थर्टीफर्स्टच्या रात्री पर्यटकांनी शांततेत नविन वर्षांचे स्वागत करावे, पर्यटनास गालबोट लागणार नाही, याची काळजी घ्यावी. मद्य, अंमली पदार्थ, हवेत उडणारे फटाके यांचा वापर करू नये. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकावर कायदेशिर कारवाई करण्यात येईल. असे राजुरचे सहाय्यक पोलीस गणेश इंगळे यांनी सांगितले

टेंन्ट कॅम्पिंग साठी कमीत कमी प्रत्येकी एक हजार रुपये दर असण्याची शक्यता असून त्यासंदर्भात वनविभागाने एक नियमावली तंबू धारकासाठी ठरवून दिली आहे.
राजूर पोलिसांकडून हरिश्चंद्रगड कुमशेत फाटा, वारंघुशी फाटा, रंधा धबधबा, वाकी फाटा व राजुर येथे तपासणी नाके उभारण्यात येणार असून मद्य व अंमली पदार्थ आढळल्यास कायदेशिर कारवाई करून साठा जप्त करण्यात येणार आहे.

वनविभागाच्या वतीनेही टेंटधारकासाठी महत्वपूर्ण सुचना वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे यांनी दिल्या असून पर्यटकांसाठी शेकोटी करताना टेंटधारकांनी काळजी घ्यावी. तसेच धरणात नौकाविहारासाठी जाण्यास परवानगी घ्यावी लागणार असून सर्व प्रकारच्या सुरक्षा व्यवस्था वापराव्या लागणार आहेत. रात्री आठ नंतर कोणत्याही पर्यटकास अभयारण्यात सोडण्यात येणार नाही. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशिर कारवाईचा इशारा दोन्ही विभागांनी दिली आहे.

