अहिल्यानगर जिल्ह्यास ६ व ७ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आवाहन
अहिल्यानगर | प्रतिनिधी
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात ६ व ७ जुलै २०२६ रोजी काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यास ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांत होणाऱ्या पावसामुळे भीमा व गोदावरी नदीवरील धरणांमधून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या भीमा नदीवरील दौंड पुलाजवळून २७,८४७ क्युसेक, तर गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून ३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून पुढील पावसाच्या प्रमाणानुसार त्यात वाढ होऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वारे सुरू असताना झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात थांबू नये. तसेच विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर, धातूचे कुंपण आणि लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्यांपासून सुरक्षित अंतर राखावे. वीज चमकत असताना विद्युत उपकरणांचा वापर टाळण्यासह सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांनी वादळी वारे, मुसळधार पाऊस किंवा गारपिटीमुळे शेतीमालाचे नुकसान होऊ नये यासाठी योग्य नियोजन करावे. बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला किंवा आणण्याचे नियोजन असलेला शेतीमाल सुरक्षित ठेवावा. तसेच जनावरांनाही सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

धरण, नदी आणि कालव्यांच्या परिसरात पर्यटनासाठी जाणे टाळावे तसेच पाण्यात उतरू नये. धोकादायक ठिकाणी सेल्फी किंवा छायाचित्रे काढू नयेत, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष (०२४१-२३२३८४४ / ०२४१-२३५६९४०) तसेच ११२ आणि १०७७ या विनामूल्य हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
