आमदार खताळांचे फक्त… आदेश, सक्त सूचना आणि निर्देश…..

अधिकारीच कामचुकार असल्याने ठेकेदार माजले !

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

गेल्या वर्षभरापासून संगमनेर शहर आणि तालुक्यातील विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्यासोबत बैठका घेऊन जनतेच्या मूलभूत सेवा सुविधा आणि विकास कामांच्या निकृष्ट दर्जाबाबत, हलगर्जीपणाबाबत संगमनेरचे नवीन आमदार अमोल खताळ यांनी बऱ्याच वेळा आदेश, सक्त सूचना आणि निर्देश दिले आहेत. ‘त्या’ ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, असे ठणकावून सांगितले आहे. मात्र वर्षभरात यावर संबंधित अधिकाऱ्यांकडून कुठलीच कार्यवाही झाली नसून त्यांना याचे काहीच सोयरसुतक नसल्याने आणि ‘अधिकारीच कामचुकार’ असल्याने ठेकेदार माजले असल्याचे बोलले जात असून पुन्हा पुन्हा बैठका घेऊन आदेश, सक्त सूचना आणि निर्देश देण्याची वेळ आमदार खताळांवर आली असल्याचे चित्र दिसत आहे.

अनेक वर्षांपासून लागलेल्या सवयी जात नसल्याने अधिकाऱ्यांकडूनच कामचुकारपणा केला जात असून निकृष्ट दर्जाच्या कामानबाबत ठेकेदारांवर कठोर कारवाई झाल्याचे अद्याप तरी समोर आलेले नाही. “तथाकथित काळी यादी देखील गुलदस्त्यात” आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यासह नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेची कामे, जलसंपदा, जलसंधारण, जीवन प्राधिकरण, ग्रामपंचायतची कामे सर्वच कामांमध्ये हलगर्जीपणा, निकृष्ट दर्जाची कामे झाली असतील तर त्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून कुठलीही कारवाई झालेली दिसत नाही. 

अशा प्रकारची सार्वजनिक कामे करताना अनेक ठेकेदारांनी कायदा धाब्यावर बसून गौण खनिज, वाळू अशा सरकारच्या विविध रॉयल्टी चक्क बुडवल्या आहेत. कोट्यवधी रुपये शासनाचे बुडवण्यात आले आहेत. आमदार खताळ यांनीच या विषयाला यापूर्वी वाचा फोडलेली आहे. अशी सर्व मंडळी देखील अगदी उजळ माथ्याने फिरत असून अद्याप त्यांच्यावरही कारवाई झालेली नाही. उलट त्यांनाच पुन्हा कामे मिळाली आहेत. आमदार खताळ यांनी देखील याबाबत पुन्हा काही कृती केल्याचे दिसून येत नाही. नेमके पाणी कुठे मुरते आहे ? याचा शोधघेणे देखील गरजेचे आहे.

शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्गाच्या तसेच शहरा बाहेरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या बाबत अनेक वेळा तक्रारी झाल्या. माध्यमांमधून काही पुढाऱ्यांनी पत्रकबाजी करून आपली हौस भागवून घेतली. मात्र संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर देखील कोणतीही कारवाई झाली नाही. ठेकेदारांना पाठीशी घालणारे अधिकारी, राजकीय पुढारी आणि अशाच स्वार्थासाठी या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणारे नेते या सर्व प्रकाराला कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.

आमदार अमोल खताळ हे आमदार झाल्यापासून अशा विविध विभागांच्या बैठका घेऊन तालुक्यामध्ये आणि त्यांच्या मतदारसंघात सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत सुविधांची कामे उत्कृष्ट दर्जाचे व्हावीत यासाठी संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना, आदेश, निर्देश देत आहेत, तशा बातम्या, प्रसिद्धी पत्रके, फोटो त्यांच्या प्रसिद्धी विभागाकडून माध्यमांकडे वेळोवेळी देण्यात देखील आले आहेत. मात्र एक वर्षाच्या कालावधीत कुठलेही ठोस पाऊल संबंधित विभागाकडून उचलले गेले नसल्याचे चित्र आहे.

जर अशा कामांवर कोणत्याच विभागात कारवाई होत नसेल तर संगमनेरातील सर्व कामे व्यवस्थित असल्याचे मानण्यास हरकत नाही. तालुक्यात आणि मतदारसंघात सर्व आलबेल आहे असेच म्हणावे लागेल. मग त्यासाठी बैठका घेऊन काळ्या यादीचा आग्रह वारंवार कशासाठी असा सवालही काही नागरिकांनी उपस्थित केला आहे. ठोस कारवाई होणार असेल तरच अशा बैठकांना महत्त्व आहे. आमदार खताळ यांचे आदेश, निर्देश, सक्त सूचना ऐकण्याच्या मनस्थितीत अधिकारी नसतील तर या समस्येचा त्यांना गांभीर्याने विचार करावा लागेल असे मत जाणकार मंडळी व्यक्त करतात.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!