संगमनेरमध्ये कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची पुन्हा मोठी कारवाई
तिघांवर गुन्हा दाखल
शहर पोलिसांचे झोपेचे सोंग कधी संपणार ?
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
संगमनेर शहरातील अवैध कत्तलखान्यांवर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई सातत्याने चालू असून अनेकवेळा छापे टाकूनही शहरात गोवंश हत्या मोठ्या प्रमाणावर सुरूच असल्याचे उघड होत आहे. एलसीबीच्या पथकाची पाठ फिरताच संगमनेरात अवैध कत्तलखान्यांमधून गोवंश हत्या सुरू होते. या गोहत्यांचे पाठीराखे नेमके कोण ? यापूर्वी आंदोलन करणारे सगळे चिडीचूप बसले आहेत. पोलीस झोपेचे सोंग घेऊन बसले आहेत. त्यामुळे या अवैधकत्तली थांबण्याचे नाव घेत नाहीत.

आज पहाटे संगमनेर शहर परिसरामध्ये कत्तलखान्याची माहिती काढत असतांना एलसीबीच्या पथकास गुप्त बातमीदारामार्फत जमजम कॉलनी, गल्ली नं. 9 संगमनेर येथे सोहेब मोहीद्दीन कुरेशी (रा. संगमनेर) हा त्याच्या साथीदारासह गोवंशी जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने आणून त्यांची कत्तल करत असल्याची माहिती मिळाली.

पथकाने तात्काळ त्या ठिकाणी खात्री केली असता काही इसम गोवंशीय जनावरांची कत्तल करत असल्याचे आढळून आले. पथक सदर इसमांना पकडण्यासाठी जात असतांना काहीजण पत्र्याच्या शेडच्या पाठीमागील दरवाजाने अंधाराचा फायदा घेत पळून गेले. 1) साहेब मोहीद्दीन कुरेशी (वय 23 वर्षे, रा. गल्ली क्र. 8, जमजम कॉलनी, संगमनेर, जि. अहिल्यानगर) 2) साहील उर्फ साद मुस्ताक कुरेशी, (रा. जमजम कॉलनी, संगमनेर (फरार), 3) अयान महेबुब कुरेशी (रा. मदीनानगर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर (फरार) अशी आरोपींची नावे आहेत.

सदर ठिकाणावरुन 4,50,000/- रुपये किमतीचे 1500 किलो गोमांस, 1,00,000/- रुपये किमतीचे दोन जिवंत गोवंशीय जनावरे, 3000/- रुपये किमतीचा इलेक्ट्रीक वजनकाटा व 300/- रुपये किमतीचे 02 लोखंडी सुरे असा एकुण 5,53,300/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

आरोपीविरुध्द संगमनेर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 127/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 271, 325, 3 (5) सह महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन 1995 चे सुधारीत 2015 चे कलम 5, (ब), 5 (क), 9, 9 (अ) सह प्राण्यांना निर्दयतेने वागविणेचे कलम 3, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.
सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, विजय पवार, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डीले, अरुण मोरे या पथकाने केली आहे.
