दरोड्याच्या तयारीत असणारी घरफोडी करणारी टोळी संगमनेर पोलिसांनी पकडली !
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
संगमनेर शहर आणि तालुक्यात घरफोड्या चोऱ्या करणारी टोळी दरोड्याच्या तयारीत असताना संगमनेर शहर पोलिसांनी पकडली असून सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 लाख 76 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सलीम अकबर पठाण (वय 26 वर्ष, राहणार जमजम कॉलनी, संगमनेर) अलीम अकबर पठाण (वय 24 वर्ष, राहणार जमजम कॉलनी, संगमनेर) वसीम मन्सूर शेख (वय 38 वर्ष, मदिनानगर, संगमनेर) निलेश बाळासाहेब शेळके (वय 40 वर्ष, राहणार रोहमवाडी, वाघापूर, संगमनेर) सलमान अकबर पठाण (वय 24 वर्ष, राहणार कोल्हेवाडी रोड, संगमनेर) अनमोल करणवासी चव्हाण (वय 19 वर्ष, राहणार घुलेवादडी, संगमनेर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

या आरोपींनी संगमनेर शहर व तालुक्यात घरफोड्या व जबरी चोऱ्या केल्याचे देखील उघड झाले आहे.
संगमनेर शहरातील पोलीस पथक रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, कोल्हेवाडी रोड लगत काहीजण मोटार सायकलवर अंधाराचा फायदा घेऊन दरोडा घालण्याच्या तयारीत फिरत आहेत. माहिती मिळताच पीएसआय पगारे यांनी स्टाफसह सदर व्यक्तींचा शोध घेण्यासाठी कोल्हेवाडी रोड परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला.

पोलिसांची गाडी येत असल्याचे लक्षात येत असते त्या ठिकाणी उभे असलेले सदर आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र पोलिसांनी सर्वांना झडप घालून पकडले आणि त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून दरोड्याचे साहित्य व इतर 1 लाख 76 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल मिळाला आहे. पोलीस कॉन्स्टेबल विजय अण्णा खुळे यांनी फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत हे करत आहेत.
