अल्पवयीन मुलीचे संगमनेर मधून अपहरण करणारा आरोपी जेरबंद !
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
तेरा वर्षे वय असणाऱ्या अल्पवयीन मुलीचे संगमनेर शहरातून अपहरण करणारा सराईत गुन्हेगार अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने जेरबंद केला आहे.
कलीम अकबर पठाण (वय- 22 वर्षे रा. गल्ली नं.10 जमजम कॉलनी, संगमनेर, ता.संगमनेर जि. अहिल्यानगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस पथक गुन्ह्यातील आरोपी व पिडीत मुलीचा व्यवसायीक कौशल्याचे आधारे शोध घेत असतांना पथकास सदर गुन्ह्यातील आरोपी हा अपहरण केलेल्या मुलीसह झरेकाठी येथून देवगाव मार्गे संगमनेर येथे विना नंबरच्या बजाज प्लॅटीना मोटार सायकलवर येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने देवगाव रोड सिध्दकला हॉस्पिटल जवळ सापळा रचून आरोपीला पीडित मुलीसह पकडले आहे. सदर मोटार सायकल त्याचा साथीदार जुनेद युनुस शेख (रा. समनापुर) या दोघांनी झोळे ता.संगमनेर येथून चोरी केल्याचे उघड झाले.

संबंधित आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर तब्बल 21 गुन्हे दाखल आहेत.
ताब्यातील आरोपी, मुद्देमाल व अल्पवयीन मुलगी यांना संगमनेर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 866/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 137(2) प्रमाणे गुन्ह्याच्या तपासकामी संगमनेर शहर पोलीस ठाणे या ठिकाणी हजर केले आहे. पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाणे हे करीत आहेत.

सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार विजय पवार, गणेश लोंढे, संतोष खैरे, फुरकान शेख, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, महिला पोलीस अंमलदार, ज्योती शिंदे, चालक भगवान धुळे यांच्या पथकाने केली आहे.
