शिवसेना शिंदे गटाचा माजी शहर प्रमुख दिनेश फटांगरेवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल !

संगमनेर | प्रतिनिधी —

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचा माजी शहर प्रमुख दिनेश फटांगरे याने स्व. पवार यांच्या विषयी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकली. एव्हढ्यावरच न थांबता त्याने या घटनेची बातमी येथील स्थानिक दैनिक युवावार्ताने प्रकाशित केल्याचा राग धरून फेसबुक पेजवर संपादक किसन भाऊ हासे यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन अश्लील पोस्ट केली. या विकृती विरूद्ध दोन दिवसांपासून सर्व पक्षीय कार्यकर्ते संताप व्यक्त करीत आहेत. त्याचबरोबर त्याच्यावर सुरूवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात झाला आहे. आता पुन्हा वर्तमानपत्र व संपादकांची बदनामी करून धमकी दिल्याप्रकरणी ‘पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत व बीएनएस नुसार’ दिनेश फटांगरेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पत्रकारांना धमकी व बदनामी केल्याप्रकरणी संगमनेर शहरात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत पहिला गुन्हा दाखल झाला आहे. किसन भाऊ हासे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती व प्रसारमाध्यम संस्था अधिनियम 2017 कलम 4 (पत्रकार संरक्षण कायदा), तसेच भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 351, 352, 353(1), 356(1) अन्वये संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फटांगरे याने विधानपरिषद आमदार सत्यजित तांबे यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन गलिच्छ पोस्ट शेअर केली, त्याच्या निषेधासाठी व गुन्ह दाखल करण्यासाठी आमदार तांबे समर्थक कार्यकर्ते पदाधिकारी आणि नगरपालिकेच्या नगरसेवकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. दोन दिवसांत तीन गुन्हे दाखल होत असलेला हा आरोपी मात्र अजूनही पोलिसांना सापडत नसल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. 

स्व. अजित पवार यांच्या विषयी घडलेल्या घटनेची बातमी या दैनिकाने प्रकाशित केली होती. तसेच फटांगरे याने स्वर्गीय पवार यांच्या निधनावर देखील समाज माध्यमातून विकृत पोस्ट व्हायरल केली होती. त्यामुळे पक्षाने तात्काळ त्याची पदावरून हकालपट्टी केली होती. सर्व वर्तमान पत्रांप्रमाणेच या बातमीला कोणताही पूर्वग्रह न ठेवता प्रसिध्दी दिली. मात्र त्याने टार्गेट करत फेसबुक पेजवर संपादकांवर वैयक्तिक स्वरूपाची टीका करून समाजात वर्तमानपत्राची व संपादकांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. याअगोदरही त्याने धमकीवजा अनेक अपमानास्पद पोस्ट केलेल्या आहेत. हे सर्व त्याने केवळ बातमीतून दुखावल्याने केले आहे. 

दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार व पत्रकार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस उपअधीक्षक कुणाल सोनवणे व शहर पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांच्यासमवेत चर्चा करून लेखी निवेदन दिले व आवश्यक पुरावे सादर केले. व्यक्तिगत पातळीवर करण्यात आलेली अश्लील, बदनामीकारक, धादांत खोटी टीका आम्ही कदापी सहन करणार नाही, असेही सांगण्यात आले. दरम्यान दिनेश फटांगरे हा सोशल मीडियावर अनेक प्रतिष्ठित नागरिकांवर अतिशय खालच्या भाषेत पोस्ट टाकत असतो. या इसमावर शहर पोलिस ठाण्यात तक्रारी व गुन्हे दाखल आहेत. आताही दोन दिवसात तीन गुन्हे दाखल होत आहेत. 

फटांगरे हा आमदार खताळ यांचा कट्टर समर्थक आहे. आमदार अमोल खताळ यांनी दिनेश फटांगरे याला वेळोवेळी समज देऊनही त्यांना डावलून त्याने बदनामीचे उद्योग चालूच ठेवले आहेत. त्यामुळे शिवसेनेने त्याची पदावरून हाकालपट्टी केली आहे. मात्र तो अजूनही पक्षात कार्यरत आहे. यासाठी आमदार खताळ यांनी नागरिकांची बदनामी लक्षात घेवून आणि त्यातून पक्षाचे होणारे नुकसान याची गांभीर्याने दखल घेऊन फटांगरेची पक्षातूनही हाकालपट्टी करावी अशी पत्रकारांची मागणी आहे.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!