संगमनेर शहरात घरफोडी, चोऱ्यांचे सत्र सुरूच !
संगमनेर प्रतिनिधी —
संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि शहराच्या भर मध्यवस्तीत घरफोडी, चोऱ्या आणि इतर प्रकारच्या अवैध कृत्यांचे उद्योग सातत्याने सुरूच आहेत. चोरट्यांनी संगमनेर शहराच्या उपनगरांसह गजबजलेल्या वस्त्यांमध्ये चौकांमध्ये देखील हात सफाई चालू ठेवली असून संगमनेर शहर पोलिसांना या गुन्ह्यांना कुठलाही आळा घालता आलेला नाही.

संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचा प्रकार घडला असून यामध्ये सोन्या चांदीचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. तर वेल्हाळे गावच्या शिवारात चोरी करण्यात आली असून या चोरीमध्ये देवाच्या मूर्तीच्या वरील सोन्याचे पान चोरून नेण्यात आले आहे.

शहरातील मदिना नगरमध्ये घरफोडी झाली असून या घोरपडीमध्ये 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. फिर्यादीच्या घराच्या लॉक चावीने उघडून घरात प्रवेश करून कपाटाच्या लॉकर मधील सोन्या-चांदीचे दागिने नेकलेस चोरून नेले आहेत. या संदर्भात नदीम सलीम तांबोळी (मदीना नगर, गल्ली नंबर 2, संगमनेर) यांनी फिर्याद दिली आहे.

तर दुसरी घटना वेल्हाळे गावच्या शिवारातील पांडमळा येथील राजू मामा मंदिरातून मूर्तीवरील चाळीस हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याचे पान चोरून नेण्यात आले आहे.
राजू बाळू अडांगळे (राहणार वेल्हाळे तालुका संगमनेर) यांनी फिर्याद दिली आहे. मंदिराच्या आत प्रवेश करून मूर्तीवरील सोन्याचे पान काढून देण्यात आले आहे. तर दानपेटी फोडून त्यातील रक्कम देखील लंपास करण्यात आली असल्याची घटना घडली आहे.

संगमनेर शहर पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. पोलिसांनी फक्त गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू ठेवले आहे. तपासात कुठलीही प्रगती होत नसून गुन्ह्याचा शोध देखील लागत नाही. आणि चोऱ्या व घरफोड्यांचे प्रमाण सातत्याने वाढत चालले आहे. एकंदरीत पाहता पोलिसांचा चोरट्यांवर कुठलाही धाक राहिलेला नसल्याचे चित्र आहे.
