नाशिक पुणे रेल्वे संगमनेर मार्गासाठी मोठे जन आंदोलन – आमदार सत्यजित तांबे
रेल्वे संगमनेर मार्गेच झाली पाहिजे – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
पळवलेल्या नाशिक पुणे रेल्वे विरोधात संगमनेरकर एकवटले
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
मुंबई नाशिक पुणे या सुवर्ण त्रिकोणामध्ये संगमनेर येत असून नाशिक पुणे रेल्वे करता लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र राजकीय स्वार्थासाठी नाशिक पुणे रेल्वे चा मार्ग बदलला आहे. कोणतेही तांत्रिक कारण न सांगता संगमनेर जुन्नर नारायणगाव मार्गे रेल्वे होण्याकरता मोठे जल आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले असून नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेर मार्गेच व्हावी अशी मागणी वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

नाशिक पुणे रेल्वे ही शिर्डी अहिल्यानगर मार्गे पुणे जाणार अशी घोषणा लोकसभेमध्ये रेल्वेमंत्री वैष्णव यांनी केली यानंतर संगमनेर सह सिन्नर नारायणगाव चाकण या भागामध्ये नागरिकांमध्ये मोठी तीव्र नाराजी पसरली यानंतर संगमनेर मध्ये सर्वपक्षीय नागरिकांनी तातडीने बैठकीत जनआंदोलन उभारण्याचा निर्धार केला.
व्यापारी असोसिएशन हॉलमध्ये झालेल्या बैठकीत मोठा जल लढा उभारण्यासाठी यल्गार पुकारण्यात आला. यावेळी आमदार सत्यजित तांबे, राजाभाऊ आवसक, हिरालाल पगडाल, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश लाहोटी, प्रकाश कलंत्री, डॉ.मैथिली तांबे, बाळकृष्ण महाराज करपे, अमर कतारी, संजय फड, संध्या खरे, सोमेश्वर दिवटे, अजय फटांगरे, निखिल पापडेजा, पप्पू कानकाटे, वसीम शेख, इसहाक खान पठाण, राजेंद्र चकोर, सुरेश झावरे, अनिकेत घुले, दत्ता ढगे, यांच्यासह संगमनेर मधील सर्व संघटना व राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेर साठी अत्यंत महत्त्वाची असून या रेल्वेसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. रेल्वे मंजूर झाल्यानंतर या भागातील भूसंपादन करण्यात आले. याचबरोबर शेतकऱ्यांना त्याची पैसेही देण्यात आले. मात्र राजकीय डाव साधत जीएमआरडीचे कारण सांगून रेल्वे शिर्डी मार्गे नेण्याचा घाट घातला जात आहे. जगामध्ये पंधरा ठिकाणी जीएमआरडीच्या प्रोजेक्ट जवळून रेल्वे गेलेली आहे .त्यामध्ये कुठलीही अडचण झालेली नाही. याचा कोणताही अभ्यास केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी केलेला नाही. हा पुण्यावरून पूणतांबा असा उलटा प्रवास असून नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेर मंचर चाकण मार्गे झाली पाहिजे यासाठी मोठा लढा उभारण्यात येणार आहे.

उद्यापासून संगमनेर तालुक्यात सह्यांची मोहीम डिजिटल कॅम्पिंग व ऑनलाईन पिटीशन दाखल करण्यात येणार असून यामध्ये सर्व नागरिकांनी राजकारण विरहित सहभाग घेऊन संगमनेर रेल्वे साठी आपला सक्रिय सहभाग द्यावा. ‘अभी नही तो कभी नही’ त्यामुळे आता प्रत्येकाचा सहभाग गरजेचा असून राजकीय कार्यकर्त्यावर केसेस दाखल असणे हे मेडल प्रमाणे असते त्यामुळे सर्वांनी सहभाग घ्या असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी हिरालाल पगडाल, राजा भाऊ आवसक, राजेश लाहोटी, प्रकाश कलंत्री, संध्या खरे, यांच्यासह अनेकांनी सूचना मांडले. यावेळी सर्व संगमनेरकर एकवटले होते.

नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेर मार्गेच व्हावी — बाळासाहेब थोरात
नाशिक पुणे रेल्वे करता आपण सातत्याने पाठपुरावा केला. याबाबतचे सर्वेक्षण पूर्ण होऊन शेतकऱ्यांना पैसे सुद्धा देण्यात आले. मात्र सरकार बदलले आणि रेल्वेचा मार्ग पळवला गेला. विकासाच्या कामात होणारे हे राजकारण अत्यंत चुकीचे असून संगमनेर हा क्रांतिकारकांचा तालुका आहे. त्यामुळे मोठा जनआंदोलनाचा लढा उभारून नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेर मार्गेच झाली पाहिजे अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

रेल्वे लढ्याच्या बैठकीत खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचा फोन.
संगमनेर मार्गे रेल्वे व्हावी याकरता व्यापारी असोसिएशन मध्ये सर्वपक्षीय नागरिकांची बैठक सुरू असताना खासदार अमोल कोल्हे यांनी आमदार सत्यजित तांबे यांना फोन केला. यावेळी ते म्हणाले की मी लोकसभेमध्ये सातत्याने संगमनेर मार्गे रेल्वे जाण्याची मागणी केली आहे. नव्याने प्रस्तावित मार्ग हा अत्यंत चुकीचा असून आपल्या सगळ्यांना मोठा लढा उभारावा लागणार आहे. यामध्ये मी सुद्धा सहभागी असून राज्याचे मुख्यमंत्री, राज्य सरकार आणि सत्ताधारी पक्ष, त्यांचे लोकप्रतिनिधी यांनी बघ्याची भूमिका न घेता या जन आंदोलनात सहभागी होऊन ही रेल्वे संगमनेर मार्गेच होईल यासाठी काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
