संगमनेरच्या कला संस्कृतीची माहिती नसलेल्यांकडून हास्यास्पद विधाने
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात कायम कलावंतांचा सन्मान
संगमनेर प्रतिनिधी —
संगमनेर शहर व तालुका ही कलावंतांची भूमी आहे. आणि येथे कायम कोणतेही राजकीय श्रेय न घेता कलावंतांचा सन्मान झाला आहे. मात्र ज्या लोकांना कलेची किंवा या क्षेत्राची कोणतीही माहिती नाही ते फक्त राजकीय फायद्यासाठी संगमनेरच्या इतिहासात पहिल्यांदा लोककलाकाराचा सन्मान होत आहे अशी हास्यास्पद विधाने करतात. हे विधान म्हणजे तमाम रसिक संगमनेरकरांचा आणि इथल्या संस्कृतीचा अपमान आहे असे प्रतिपादन आदिवासी सेवक बाबा खरात यांनी केले.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात खरात यांनी पुढे म्हटले आहे की, मंत्री विखे पाटलांनी पहिले संगमनेरच्या शेकडो वर्षांच्या कलारसिकतेचा आणि सांस्कृतिक परंपरेचा अभ्यास करावा. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी संगमनेर नगर परिषदेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संगमनेर मधील सर्व लोककलावंतांचा सन्मान केला होता. यामध्ये गुलाबबाई संगमनेरकर व त्यांच्या भगिनी मीराबाई संगमनेरकर यांच्यासह तत्कालीन अनेक कलावंतांचा समावेश होता.

ही परंपरा पुढे नेताना संगमनेरचे लोकप्रतिनिधी बाळासाहेब थोरात यांनी कायम लोककलावंत राज्य पातळीवर कलावंत, स्थानिक कलावंत यांचे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याबरोबर या सर्वांचा अत्यंत आदरपूर्वक सन्मान केला यामध्ये कधीही राजकीय श्रेय त्यांनी घेतले नाही.
तमाशा क्षेत्रातून संगमनेरचे नाव राज्यभर पोहोचवणाऱ्या कांताबाई सातारकर यांचा संगमनेरकरांच्या वतीने पहिला नागरी सत्कार 9 सप्टेंबर 2003 रोजी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून झाला आहे. कलाकारांचा सन्मान करताना त्याला राजकीय स्वरूप येऊ नये म्हणून या कार्यक्रमाला तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ज्येष्ठ उद्योगपदी अरविंद मफतलाल यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केले होते.

शाहीर विठ्ठल उमप हे मूळचे संगमनेर तालुक्याचे भूमिपुत्र. त्यांचा पहिला नागरी सत्कार देखील लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून सन २००७ मध्ये कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह येथे करण्यात आला होता. यावेळी विठ्ठल उमप यांच्या प्रसिद्ध जांभूळ आख्यान या कार्यक्रमाचे आयोजन संगमनेरकरांसाठी करण्यात आले होते. ज्येष्ठ इतिहास संशोधक सुरेश काका जोशी, जेष्ठ विचारवंत डॉ.रावसाहेब कसबे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या सत्कार सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे संगमनेच्या इतिहासात कवी अनंत फंदी नाट्यगृहात पहिल्यांदा इतकी गर्दी झाली होती.

2009 मध्ये तत्कालीन कृषी व शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुधीर तांबे व दुर्गाताई तांबे यांच्या उपस्थितीमध्ये गुलाबबाई संगमनेरकर यांचा कवी अनंत फंदी नाट्यगृहात भव्य सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ विचारवंत एस.झेड. देशमुख हेही प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ लावणी कलावती गुलाबबाई संगमनेरकर, कांताबाई सातारकर आणि त्यांच्या भगिनी सुशीलाबाई सातारकर यांनी एकत्रितपणे सादर केलेला लावणी नृत्याविष्कार आजही संगमनेरकरांचच्या स्मरणात आहे.
वरील लोककलाकारांसह विविध क्षेत्रातील कलावंतांचा बाळासाहेब थोरात यांनी आजवर वारंवार सन्मान केला आहे. मात्र त्या कोणत्याही कार्यक्रमाला राजकीय स्वरूप देण्याचा किंवा त्यातून श्रेय मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांनी कधीच केला नाही.

अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक सांस्कृतिक व वैचारिक कार्यक्रमांचे आयोजन हे संगमनेर मध्ये होत असते. यातल्या बहुतांशी कार्यक्रमांच्या आयोजनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग हे हीं सर्वश्रुत आहे.
मात्र ज्या लोकांना साहित्य, कला संस्कृती यांची बिलकुल जाण नाही किंवा ज्यांचा या गोष्टींशी संबंध नाही असे लोक संगमनेरमध्ये येऊन राजकीय फायद्यासाठी हास्यास्पद विधाने करत आहेत. त्यांनी अगोदर संगमनेरची कला संस्कृती अनुभवावी त्यासाठी काहीतरी योगदान द्यावे मग बोलावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

कांताबाई सातारकर यांचा सर्वप्रथम सन्मान हा बाळासाहेब थोरात यांच्याकडून
तमाशा सम्राज्ञी मातोश्री कांताबाई सातारकर यांनी तमाशाच्या माध्यमातून महाराष्ट्राची सेवा केली त्यांच्या कलेचा आणि कार्याचा गौरव व्हावा याकरता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. आईचा संगमनेरकरांच्या वतीने पहिला नागरी सत्कार हा बाळासाहेब थोरात यांनीच केला आहे. याबद्दल आमचा परिवार कृतज्ञ आहे. याचबरोबर कोरोना संकट काळामध्ये त्यांनी कलावंतांना मोठी मदतही केली आहे . त्यांचे संगमनेरच्या कला संस्कृतीत मोठे योगदान राहिले आहे
रघुवीर खेडकर, ज्येष्ठ तमाशा कलावंत, संगमनेर
