ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या पंच्याहत्तरी निमित्ताने सह्याद्री देवराई सायखिंडी या ठिकाणी पंच्याहत्तर वृक्ष लागवड कार्यक्रम !
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 27
ताम्रपटकार, साहित्यातले पाटील ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त 75 वृक्ष लागवडीचा कार्यक्रम संगमनेर तालुक्यातील सह्याद्री देवराई सायखिंडी या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. दिनांक 29 जून रोजी सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे आणि लेखक अरविंद जगताप यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे अशी माहिती आयोजक सिताराम राऊत यांनी दिली आहे.


संगमनेरकरांचे भूषण, ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे हे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक व अनेकांचे उत्तम मित्र आहेत. सह्याद्री देवराई महाराष्ट्र भर निसर्ग संवर्धनाचे, पर्यावरण जोपासण्याचे काम करते . ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे व अनेक पर्यावरण तज्ञ मिळून महाराष्ट्रात चाळीस ठिकाणी चाळीस देवराया नव्याने, अत्यंत नियोजित पद्धतीने लोक सहभागातून उभ्या राहिल्या आहेत.

संगमनेर तालुक्यात सायखिंडी या अत्यंत दुष्काळी व अवर्षण प्रवण क्षेत्र असलेल्या गावात देवराई आहे. गेली बारा वर्ष या ठिकाणी एक एक झाड लावण्याचा व ते जगवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. लोकपंचायत संस्थेने या ठिकाणी माती आडवा पाणी जिरवा या कामाला सुरुवात केली. त्यानंतर हा सह्याद्री देवराईचा प्रकल्प उभा राहिला आहे. खरे तर 2011-12 मध्ये परिस्थिती अशी होती की आत्ता जिथे सह्याद्री देवराई उभी आहे, त्या ठिकाणी खुरटे झाड-झुडुप देखील नव्हतं. अत्यंत उजाड आणि भकास हा परिसर होता. आता या ठिकाणी लाखापेक्षा जास्त झाडे दिमाखाने उभी आहेत. केवळ झाडेच नाही तर या ठिकाणी एक पर्यावरणाची साखळीच निर्माण झाली आहे.

नानाविध पक्षी, वन्यजीव सहजपणे या ठिकाणी बागडतात. त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची उन्हाळ्यात व्यवस्था करण्यात आली आहे. निर्माण झालेली देवराई म्हणजे एक अनोखे व अत्यंत रमणीय ठिकाण झाले आहे. खरंतर सायखिंडी हे असे गाव आहे की जिथे पिण्याच्या पाण्यासाठी बाराही महिने शासनाला पाण्याचा टँकर पाठवावा लागत आहे. त्यामुळे झाडे जगवण्यासाठी पाणी निर्माण करणे हे देखील मोठे काम होते व पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून व श्रमदानातून करण्यात आले. प्रचंड मेहनत व संयम यासाठी ठेवावा लागला आहे. गेल्याच उन्हाळ्यात मोठा वणवा या ठिकाणी लागला. झालेल्या नुकसानातून परत झाडे उभे राहत आहेत. हे सगळंच मोठं मजेशीर व अत्यंत आनंददायी आहे.

अशाप्रकारे महाराष्ट्रात उभ्या राहणाऱ्या या सह्याद्री देवराई प्रकल्पाला रंगनाथ पठारे सर यांचे मार्गदर्शन व पाठिंबा सतत असतो. त्यांच्या स्वभावानुसार पंच्याहत्तरी साजरी करणे किंवा अशा प्रकारच्या कार्यक्रमाला त्यांची संमती मिळणे जरा कठीण काम. परंतु देवराईत त्यानिमित्ताने वृक्षारोपण होईल व देवराईत काही मित्र जमून गप्पागोष्टी होतील या कारणाने त्यांनी होकार दिला.

दिनांक 29 जून 2025 रोजी सकाळी ठीक 10 वाजता सह्याद्री देवराई सायखिंडी या ठिकाणी आपण या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी यावे, सहभागी व्हावे, ही नम्र विनंती. या कार्यक्रमासाठी स्वतः रंगनाथ पठारे सर, प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे, लेखक, चित्रपट कथालेखक, अरविंद जगताप, सरपंच संसदेचे राष्ट्रीय समाज योगेश पाटील, पांडुरंग सोनवणे व अन्य निमंत्रित मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत यांनी दिली आहे.
