निवडणूक आयोग भाजपासाठी काम करतो — माजी मंत्री बाळासाहेब थोरात
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून मॅच फिक्सिंग
सत्तेसाठी भाजपा व महायुती कडून काहीही
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क दि.11 —
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या गैरप्रकाराबाबत देशाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण लेख लिहून सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. यातील प्रश्नांना निवडणूक आयोग समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. भाजप व त्यांचे मित्र पक्ष सत्तेसाठी काहीही करत असून निवडणूक आयोग आता स्वायत्त राहिलेला नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांकडून मॅच फिक्सिंग करण्यात असल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

या संदर्भात थोरात यांच्या यशोधन या प्रसिद्धी कार्यालयातून प्रेस नोट देण्यात आली असून त्यात म्हटले आहे की, काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीमध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीबाबत अनेक वेळा सरकारला आणि निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले. मात्र अद्यापही निवडणूक आयोग समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. जनतेचे लक्ष वळवण्यासाठी काही मंत्री उत्तर देत आहेत. या संदर्भाने उत्तर देण्याचे काम निवडणूक आयोगाचे आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला अत्यंत चांगले वातावरण होते. विधानसभेलाही चांगले होते. मात्र वाढलेले मतदार, शेवटच्या तासामध्ये वाढलेला मतदानाचा टक्का. आणि भाजप चा 149 जागांपैकी 132 विजय, इतका मोठा स्ट्राईक रेट हे सर्व संशयास्पद आहे.
जनतेच्या मनात आजही ईव्हीएम बाबत शंका आहे. अनेक ठिकाणी बोगस मतदान झाले. इतके मतदार वाढले कसे ? काही ठिकाणी लोकसंख्येपेक्षा मतदानाचे रजिस्ट्रेशन कसे जास्त होऊ शकते. शेवटच्या तासामध्ये सहा लाख मतदान कसे वाढले अशा अनेक गोष्टी शंकास्पद आहेत. याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एका होस्टेलमध्ये 7000 मतदार नोंदणी आणि त्यांना निवडणुकीचे कार्ड सुद्धा देण्यात आले होते. हा काय प्रकार आहे ? भाजप आणि मित्रपक्ष जिंकण्यासाठी काहीही करतात. निवडणूक आयोग स्वायत्त असला पाहिजे. मात्र आता तसे राहिले नाही तो बीजेपी साठी काम करत आहे.

निवडणूक निकालानंतर व्हीव्हीपॅटच्या स्लिप मिळायला पाहिजे होत्या. परंतु त्या निवडणूक आयोगाने नाकारल्या. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे 157 उमेदवार विजयी होतील हे खात्रीशीर होते. परंतु मतदार वाढवणे हे त्यांचे प्लॅनिंग चे राजकारण होते. अनितीचे राजकारण हे लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे .

खासदार राहुलजी गांधी यांच्या प्रश्नांना उत्तरे मिळत नाहीत. निवडणूक आयोग ऐवजी दुसरेच लोक उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्तेसाठी काहीही करणाऱ्या भाजपने महाराष्ट्र विधानसभेमध्ये मॅच फिक्सिंग केली असल्याची टीका करताना देशाची लोकशाही राज्यघटना टिकली पाहिजे यासाठी आमचा लढा सुरू राहील असेही थोरात यांनी म्हटले आहे.
