अकोले तालुका एज्युकेशन संस्थेचे आंदोलन लाहमटेंनी अर्धवट सोडू नये : माकप

अकोले प्रतिनिधी दिनांक 11

अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी ही संस्था नक्की कुणाची याबाबत संघर्ष पुन्हा सुरू झाला आहे. 15 मे रोजी याबाबत धर्मादाय आयुक्तांकडे सुनावणी असल्याचे सांगितले जात आहे. ही संस्था कुणा एका व्यक्तीची किंवा कुटुंबाची नसून ती संपूर्ण तालुक्याची संस्था आहे. ही संस्था उभारण्यासाठी तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते, नेते व जनतेने अतिव योगदान दिलेले आहे. या संस्थेचे हे जनताकेंद्री स्वरूप असेच रहावे यासाठी तालुक्यात आंदोलन सुरू झाले होते. मात्र दूध संघाच्या निवडणुकीत झालेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर व विधानसभा निवडणुकीत तिसरा उमेदवार उभा करून खेळण्यात आलेल्या खेळीच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन थंड बासनात गुंडाळून ठेवण्यात आले आहे.

संस्थेच्या घटनेत बदल करण्यात आल्यामुळे या संस्थेची मालकी जनतेची न राहता विश्वस्तांची राहील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मधुकर पिचड यांच्या निधनानंतर आता या संस्थेच्या मालकीबाबत काय होणार ? याबाबत चिंता व्यक्त होत आहे. वर्तमानपत्रांची कात्रणे पाहता या संस्थेबाबत सुरू झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केले होते असे दिसते. त्यांनी हे आंदोलन अर्धवट का सोडले हा गंभीर प्रश्न आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नेहमीच जनतेबरोबर राहिलेला आहे. प्रसंगी राजकीय अभिनिवेश सोडून संस्थेसाठी अनेक सर्वपक्षीय कार्यकर्ते, बुद्धिजीवी भूमिका घेत आले आहेत. अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी ही संस्था तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असल्याने ही संस्था जनतेच्या मालकीची राहावी यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची भूमिका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष घेत आहे.

 

 

संस्थेचे तत्कालीन विश्वस्त मधुकर पिचड यांनी लेखी स्वरूपात मान्य केल्याप्रमाणे संस्थेच्या घटनेत योग्य ते बदल करून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना संस्थेचे सभासदत्व द्यावे व संस्थेला सर्वपक्षीय स्वरूप पुन्हा बहाल करावे अशी मागणी कॉम्रेड सदाशिव साबळे, एकनाथ मेंगाळ, नामदेव भांगरे, प्रकाश साबळे, राजाराम गंभीरे, वसंत वाघ, लक्ष्मण घोडे, सुनील बांडे, दत्ता कोंडार, सुमन विरनक, तुळशीराम कातोरे, गणेश ताजणे, संगीता साळवे, हेमलाता शेळके, ज्ञानेश्वर काकड मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!