विखेंची गुलामी करण्यापेक्षा संगमनेरच्या हिताचा विचार करा —
काँग्रेसचे संगमनेर शहर अध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांची आमदार खताळांवर जहरी टीका
संगमनेर प्रतिनिधी दि. 15
लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे 40 वर्ष संगमनेर तालुक्याला सांभाळलेले आहे. म्हणूनच महाराष्ट्राच्या विकसित तालुक्यांमध्ये संगमनेरची गणना होते. अवघ्या तीन महिन्यात पालकमंत्र्यांच्या हातचे बाहुले झालेल्या आमदार अमोल खताळ यांनी आपण विखे यांना नाही तर संगमनेरकरांना बांधील आहोत याचे भान बाळगले पाहिजे. वीज प्रश्नाच्या संदर्भाने साधे नियोजन ज्यांना करता येत नाही, त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका करणे म्हणजे शुद्ध बालिशपणा आहे. त्यामुळे विखेंची गुलामी करण्यापेक्षा संगमनेरच्या हिताचा विचार करा अशी घनाघाती जहरी टीका संगमनेर शहर काँग्रेसचे अध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिवटे यांनी म्हटले आहे की , आमदारांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे, आमदारांच्या आजूबाजूला असलेले टवाळखोर, तस्कर आणि खंडणी बहाद्दर आता हा तालुका चालवणार का? दहशत आणि दादागिरी करून राजकारण करणार का? स्व. भास्करराव दुर्वे, दत्ता देशमुख, बी जे खताळ पाटील, भाऊसाहेब थोरात, बाळासाहेब थोरात ही सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आमदारांना सांभाळता येत नसेल तर त्यांनी गप्प बसावे मात्र संगमनेरचा अपमान करू नये. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल कसा लागला हे संपूर्ण देशाला माहित आहे. त्यामुळे जी काही आमदारकी तुम्हाला मिळाली आहे तिचा आनंद घ्या, संगमनेरवर सूड उगवू नका. विकास कामे बंद पाडू नका आणि महत्त्वाचे म्हणजे टक्केवारीत अडकू नका. दादागिरी करणाऱ्यांना आणि गुंडांना पाठीशी घालू नका.

संगमनेर मध्ये विजेचा प्रश्न गंभीर झाला आहे. जिथे पूर्वी बारा तास पूर्ण दाबाने लाईट मिळायची तिथे अवघी चार-पाच तास लाईट मिळते. रोहित्र वेळेवर मिळत नाही, पाणी वाहून चालले आहे. या सर्व गोष्टींना फक्त आणि फक्त आमदारांचा नाकारतेपणाच कारणीभूत आहे. आमदारांना संगमनेर तालुक्याशी काहीही घेणे देणे नाही पालकमंत्री सांगतील तसे ते वागत आहेत. दादागिरी आणि दमदाटी करून चुकीचे राजकारण करण्याचा प्रयत्न त्यांचा आणि त्यांच्या पिलावळीचा आहे. आढावा बैठकांमध्ये मुळात जनतेचे प्रश्न सोडवायचे असतात त्याला गती द्यायची असते चालू असलेली कामे बंद करायची नसतात. मात्र टक्केवारीच्या आशेने थेट पालकमंत्र्यांना बोलवून खंडणी वसुलीचा कार्यक्रम झाल्याचे आमचे स्पष्ट मत आहे. आढावा बैठक म्हणजे अधिकाऱ्यांवर दादागिरी करून खंडणी उकळण्याचा अत्यंत घुणस्पद प्रकार होता. अनेक अधिकारी खाजगीत संगमनेर तालुक्यात वाढलेली टक्केवारी, खंडणी आणि दादागिरी याबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. चुकीच्या प्रवृत्ती आणि चुकीची माणसं सांभाळून संगमनेर तालुक्याचे नाव बदनाम करण्याचा घाट घातला जातो आहे. हे सर्व पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाने आणि आमदारांच्या सहमतीने सुरू आहे, असाही घनाघाती आरोप दिवटे यांनी केला.

पालकमंत्र्यांनी संगमनेर मध्ये येऊन आढावा बैठक घेतली, ही काही संगमनेरच्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी घेतलेली बैठक नव्हती. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची राजकीय बैठक होती, संगमनेर मध्ये सुरू असलेली विकास कामे बंद पाडण्यासाठी घेतलेली बैठक होती. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर नाशिक पुणे रेल्वे चा मार्ग बदलतोच कसा? आमदार खतांनी पालकमंत्र्यांना हे भर बैठकीत विचारायला पाहिजे होते. संगमनेर करांना न विचारता अप्पर तहसील कार्यालय निर्माण करण्याचे षडयंत्र कोणाच्या सांगण्यावरून झाले? आमदारांनी हा प्रश्न सुद्धा पालकमंत्र्यांना विचारायला हवा होता. नदीतून पाणी वाहून चालले आहे, पूर्ण दाबाने वीज मिळत नाही, यासाठी काय उपाययोजना करणार? याचा आराखडा आमदारांनी द्यायला पाहिजे होता. या उलट जलजीवांची चालू असलेली कामे बंद पाडणे, कंत्राटदारांना चकरा मारायला लावणे असलेच उद्योग सुरू झाले आहेत. ज्यांचा मूळ पिंड खंडणीचा आहे, या अगोदरही ज्यांनी फक्त लोणीचा खबऱ्या म्हणून काम केले आहे त्यांच्याकडून तशी फार अपेक्षा नाही. मात्र आता तुम्ही आमदार झालेले आहात वागताना आणि बोलताना भान बाळगायला हवे असाही सल्ला, दिवटे यांनी दिला.

बजेटमध्ये संगमनेरला भोपळा
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये संगमनेर तालुक्याला काहीच मिळाले नाही, चाळीस वर्षात पहिल्यांदाच असे घडले आहे. आमदारांनी बाकीची टिवटिव करण्यापेक्षा आपण संगमनेरसाठी बजेटमध्ये काहीच आणू शकलो नाही याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
सांभाळता येत नसेल तर निदान गप्प बसा
विकास कामांचा महाकाय डोंगर उभा केला म्हणूनच 40 वर्ष जनतेने बाळासाहेब थोरात यांना आमदार केले. ही विकासाची परंपरा सांभाळता येत नसेल तर आमदारांनी गप्प बसावे मात्र संगमनेर कुणाला विकण्याचे पाप करू नये.
